धाराशिव रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी २१.७२ कोटी रुपये मंजूर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे साधला नागरिकांशी संवाद
खासदार व आमदारांच्या उपस्थितीत रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी
धाराशिव – समय सारथी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ५०८ रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी करण्यात आली.यामध्ये धाराशिव रेल्वे स्टेशनचा समावेश असून त्याच्या पुनर्विकासासाठी २१.७२ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे नागरिकांशी संवाद साधला.
रेल्वे मंत्रालयाने देशभरातील एकूण १३०९ स्थानकांचे चित्र पूर्णपणे बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्या आधुनिकीकरणासाठी “अमृत भारत स्टेशन” या योजनेअंतर्गत नवीन धोरण तयार केले आहे.या महत्वाच्या योजनेअंतर्गत मध्य रेल्वेतील ७६ रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे.त्यामध्ये रेल्वेच्या सोलापूर विभागातील १५ प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
या १५ स्थानकांमध्ये सोलापूर, पंढरपूर,कुर्डुवाडी,कोपरगाव, अहमदनगर, दौड,धाराशिव,लातूर, कलबुर्गी,शहाबाद,वाडी,जेऊर, बेलापूर,गाणगापूर रोड व दुधानी रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. “अमृत भारत स्टेशन” योजनेमुळे या सर्व स्थानकांचा कायापालट होणार आहे.त्यामुळे रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सेवा पुरविण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न राहणार आहे.
धाराशिव हे इतिहास आणि संस्कृती असलेले शहर आहे.प्राचीन किल्ले,मंदिरे आणि स्थापत्य रत्नांसह, उस्मानाबाद भूतकाळ आणि वर्तमानाचे एक मोहक मिश्रण आहे.
धाराशिव येथील कार्यक्रमात विविध शाळेतील मुला मुलींनी नृत्य आणि पारंपरिक कार्यक्रम सादर केले. यावेळी लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील,महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य एडवोकेट मिलिंद पाटील,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे व निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रेल्वे स्थानक परिसरातील परिभ्रमण क्षेत्र विकास,सुनियोजित आणि उत्तम पार्किंग व्यवस्था व पदपथ,निसर्गरम्य गार्डन उभारण्यात येणार असुन स्टेशन कार्यालयाचे व परिसराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. स्थानकात प्रवेश करण्यासाठी उचित योग्य दरवाजे,मार्गिका व आकर्षक असे उच्च मुख्य दर्शनी भाग तयार करण्यात येणार आहे.तसेच १२ मीटर रुंद पादचारी पूल,स्थानकाच्या सभोवतालची व दर्शनी भागाची रोषणाई,साइनेज बोर्डचे अपग्रेडेशन, स्थानकाच्या आतील व बाहेरील उत्तम दर्जाचे रंगित डिस्प्ले बोर्डाची तरतूद, टॉवर चाळ जीपीएस आधारित, स्टेशन इमारतीच्या नूतनीकरणामध्ये सुधारित शौचालये/ स्वच्छतागृहे, जलनि:सारणाची कामे,उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म,प्लॅटफॉर्मवरील छत,संकेत फलक, कोच इंडिकेटर,उद्वाहक (लिफ्ट) आणि विविध प्रकारच्या विद्युत कामांचा समावेश आहे.
मुख्य कार्यक्रमानंतर वेगवेगळ्या शाळेतील निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्प,प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रेल्वे विद्युत अधिकारी अनुभव वर्षनेय यांनी केले. संचालन आणि उपस्थितांचे आभार आकाशवाणीचे निवेदक दौलत निपाणीकर यांनी मानले.यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, रेल्वे प्रवासी,रेल्वे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.