धाराशिव नगर परीषदेत घोटाळ्यांची मालिका – उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भुमिकेकडे लक्ष
विशेष लेखापरीक्षण,आयएएस दर्जाचा अधिकारी नेमा – भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषद अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता बाहेर आली असुन नगर परिषदेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. फौजदारी गुन्ह्याच्या मालिकेनंतर रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत तर तुळजापूर व धाराशिव नगर परिषदेत झालेल्या नियमबाह्य नौकर भरती, धाराशिव नगर परिषदेत चूकीची गुंठेवारी यासह अन्य प्रकरणाची चौकशी सुरु असुन डेडलाईन संपुन 15 दिवस उलटले तरी अद्याप अहवाल समोर आलेला नाही. बायोमायनिंग विषय असो की संचिका गहाळ प्रकरणे अशी अनेक बाबी चर्चेत आहेत. धाराशिव नगर परिषदेचे विशेष लेखापरीक्षण करावे तसेच आयएएस दर्जाचा अधिकारी नेमा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 16 जुन रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असुन ते जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामे, योजना याचा आढावा घेणार आहेत. त्या बैठकीत धाराशिव नगर परिषदबाबत चर्चा होऊन निर्णय होणार का ? हे पाहावे लागेल.
धाराशिव नगर परिषदेत झालेल्या भ्रष्टाचार व विविध तक्रारीच्या अनुषंगाने आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्न करुन आवाज उठवला आहे. या सर्व तक्रारी प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी व सनियंत्रणासाठी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी रामकृष्ण जाधवर यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
धाराशिव नगर परिषदेची स्तिथी पूर्ववत होण्यासाठी आपल्या स्तरावर आयएएस दर्जाचा अधिकारी देण्याची शिफारस महाराष्ट्र शासनास करावी अशी मागणी आमदार धस यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती त्यावर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी नगर परिषद प्रशासन अधिकारी यांना याबाबत अपर मुख्य सचिव याना अग्रेषित करावे असे पत्र दिले आहे.
नगर परिषदेतील भंगार चोरी, बोगस गुंठेवारी, नियमबाह्य बांधकाम परवाने, कागदपत्रे संचिका गहाळ यासह अनेक बाबी विधिमंडळात गाजल्या असुन यापूर्वी गुन्हे नोंद झाले आहेत तर काही प्रकरणे चौकशीच्या व कारवाईच्या अंतीम टप्प्यात आहेत त्याला गती येणार का ? याकडे लक्ष लागले आहे.