धाराशिव फलकाचा अनावरण सोहळा मोठ्या थाटात वाजत गाजत संपन्न – जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते फलकाचे अनावरण
धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील / दालनातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी धाराशिव या फलकाचा अनावरण सोहळा मोठ्या थाटात ढोल ताशांच्या गजरात संपन्न झाला. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे त्यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यासह मान्यवरांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार पांडे यासह अधिकारी, कर्मचारी, पत्रकार उपस्थितीत होते.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारत व परिसरातील सर्व कार्यालयाच्या बोर्डावर धाराशिव करण्यात आले आहे. सर्व मान्यवरांनी जिल्ह्यातील महसूल, पोलिस विभाग व जिल्हा परिषद विभागातील नावे, बोर्ड, फलकावर धाराशिव अशी नोंद केल्याचे जाहीर केले. बसस्थानकावर सुद्धा धाराशिव केले गेले आहे.
उस्मानाबाद जिल्हा, तालुका, उप विभाग व गावाचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी यांची तात्काळ अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. धाराशिवकरांची अनेक वर्षाची स्वप्नपूर्ती आज अखेर प्रत्यक्षात पुर्ण झाली. उद्या 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन असुन अनेक शासकीय कार्यक्रम होणार असल्याने कार्यालयाच्या बोर्डावर धाराशिव नाव टाकण्यात आले आहे.
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे अखेर जिल्हा, तालुका गाव धाराशिव झाले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात धाराशिव नामकरण बाबत मुस्लिम समाजातील काही जणांनी याचिका दाखल केली. त्यावेळी राज्य सरकारने सुनावणी दरम्यान कोर्टात सांगितले की केवळ धाराशिव शहराचे नाव बाबत राजपत्र प्रसिद्धी केले आहे त्यामुळे धाराशिव जिल्हा व धाराशिव तालुका बाबत दाखल याचिका निकाली निघाली. नेमकी हीच कायदेशीर बाब साधत सरकारने जिल्हा, उप विभाग व तालुका याचे धाराशिव राजपत्र प्रसिद्ध करीत अधिसूचना काढली.