धक्कादायक – तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणारी अल्पवयीन मुलगी गरोदर
बालविवाह की अत्याचार ? प्रशासनाकडुन कारवाई अपेक्षीत – नोंदी नसल्याने अनेक प्रकार दडपले
अशासकीय संजयकुमार बोंदर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
तुळजापूर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
तुळजाभवानी मंदिर परिसरात भिक मागणारी एक 13 ते 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.या घटनेबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि पोलीस अधीक्षक निवा जैन यांना कळविले असल्याची माहिती बाल सहाय्य पोलीस पथकाचे अशासकीय सदस्य संजयकुमार बोंदर यांनी दिली असुन आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार हे पाहावे लागेल. आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर शहरात हा प्रकार घडला असुन या मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फुटली आहे.भीक मागणाऱ्या अनेक अल्पवयीन मुलीवर असे अत्याचार होत असुन अनेक प्रकरणे दडपली जात आहेत असा आरोप बोंदर यांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाकडे तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणारी मुले मुली यांची कोणतीही नोंद नसल्याने असे प्रकार घडत आहेत त्यामुळे यावर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
तुळजाभवानी मंदिर परिसरातील शिक्षणबाह्य बाल भिक्षेकरीना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व अल्पवयीन मुलांचा भिक मागण्यासाठी वापर करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी विशेष बाल सहाय्य पोलीस पथकाचे अशासकीय सदस्य संजयकुमार बोंदर यांनी जिल्हाधिकारी तथ जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तुळजाभवानी मंदिर परिसरात अल्पवयीन मुले व मुली भीक मागत आहेत. तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणारी सर्व मुले शिक्षणापासून वंचित आहेत.कोविड 19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने मागील दीड वर्षांपासून शाळा बंद केल्यामुळे भिक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामध्ये वय वर्ष अंदाजे 13 ते 15 वयोगटातील मुलींचे त्याच्याच नातेवाईकांकडून शोषण होत असल्याचे दिसून येत आहे. वयाच्या 15 व्या वर्षी आई झालेल्या आहेत मग त्याचा बालविवाह झालेला असेल किंवा त्याच्यावर शारीरिक अत्याचार होत असेल. मंदिर परिसरात अल्पवयीन मुलांना भीक मागायला लावून बरेच पालक स्वतः नशापाणी करून लहान मुलांवर देखरेख करत बसलेली असतात. मंदिर परिसरात आठ ते दहा वर्षाची मुले – मुली स्वतःच्या काखेत झोळी बांधून एक ते दोन महिन्याचे बाळ झोपवून भाविकांना भीक मागत असतात. झोळी मधील बालक कधीच रडत नाही, ते बालक दिवसभर झोळीत झोपलेले असते त्या बाळाला काही तरी नशा करून झोपवले असण्याचा संशय येत आहे.
या बालकांकडून करवून घेतले जात असलेले कृत्य हे बालकांच्या अधिकारांच्या विरोधी तर आहेच पण बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम,२०१५ मधील कलम ७९ अन्वये शिक्षापात्र गंभीर गुन्हा देखील आहे त्यासाठी पाच वर्षांपर्यंत कैद आणि एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे त्यामुळे बालकांना अशा शोषणापासून मूक्त करणे आवश्यक आहे, त्यांना त्यांचे बाल अधिकार मिळावेत यासाठी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.