गुन्ह्यांची मोठी पार्श्वभूमी – जागा हडप करण्याची मालीका , हद्दपारीसह वर्षाची शिक्षा
जुने बसस्थानक समोरील अतिक्रमण काढण्याची कदम यांची मंत्र्यांकडे मागणी
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी देवानंद साहेबराव रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब साहेबराव रोचकरी यांच्यासह अन्य अज्ञात इतर आरोपी विरोधात 10 ऑगस्टला तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असुन रोचकरी बंधू फरार आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत असून यातील 2 जणांपैकी एक जणांचे मोबाईल लोकेशन औरंगाबाद व दुसरा कोल्हापूर येथील पन्हाळा येथे सापडले होते. पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने रोचकरी यांच्या घरी जाऊन तपास करीत झडती घेतली मात्र ते घरात आढळून आले नाहीत. फरार रोचकरी बंधूना अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथके शोध घेत आहेत. या प्रकरणातील कागदपत्रे व पुरावे पोलिसांनी गोळा करण्यावर भर दिला आहे. दरम्यान मंकावती प्रकरण नंतर अनेक तक्रारी समोर येत आहेत. रोचकरी यांच्यावर आजवर अनेक गंभीर गुन्हे नोंद असून पोलीस त्याची जंत्री जमा करीत आहेत. देवानंद रोचकरी यांच्यावर दाखल गुन्ह्याचा इतिहास मोठा असुन हद्दपार कार्यवाहीसह एका गुन्ह्यात त्यांना शिक्षा सुद्धा झाली असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना 15 मे 2007 रोजी नगर परिषद कार्यलयात जाऊन शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी देवानंद रोचकरी यांना उस्मानाबाद कोर्टाने 22 डिसेंबर 2015 रोजी 1 वर्षाची शिक्षा व 10 हजारांचा दंड ठोठावला होता , त्या प्रकरणात रोचकरी हे जामीनावर आहेत.
रोचकरी यांनी तुळजापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील तसेच जुने बसस्थानकसमोरील बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ हटवावे व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे कायदा विभागाचे तालुका कार्याध्यक्ष ऍड जनक धनंजयराव कदम- पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या दोन्ही सरकारी जागा बळकावण्याच्या हेतूने रोचकरी यांनी भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बोगस कागदपत्रे बनविल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते हे पाहावे लागेल. रोचकरी यांचे जुने बसस्थानक समोर रोडलगत मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स असून या उद्योगाला राजकीय पाठबळ मिळावे यासाठी त्यांनी तिथे भाजपचे संपर्क कार्यालय सुरू केले होते मात्र काळानुसार या व्यापारी संकुलवरील भाजप झेंडे केव्हाचेच गळून पडले आहेत. दरम्यान रोचकरी यांचा सध्या भाजपशी कसलाही संबंध नसल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिली आहे.
देवानंद रोचकरी यांच्यावर मंकावती तिर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करणे, फसवणूक करणे यासह कलम 420, 468,469,471 व 34 सह गुन्हा नोंद असून तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद करीत आहेत. या प्रकरणात रोचकरी यांना कोण कोण मदत केली ? या कटात तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयासह नगर परिषद व इतर कार्यालयातील कोणते घोटाळेबाज अधिकारी अडकले आहेत ? याचा पोलीस तपासात करीत आहेत.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 4 वेगवेगळ्या मुद्यावर कारवाईचे आदेश जारी केले होते. जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक यांनी मूळ आखीव पत्रिकेवर महाराष्ट्र शासन यांचे नगर परिषद निगराणीखाली नोंद नियमित करावी. सदर कुंड प्राचीन असल्याने प्राचीन स्वरूपातील बांधकामात काही बदल झाले असतील तर औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांनी पुरातत्व संवर्धन कायदा १९०४ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. बनावट कागदपत्रे प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी व तुळजापूर तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सदर जागी अतिक्रमण होणार नाही यांची दक्षता घ्यावी असे चार मुद्दे आदेशित केले होते त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे. मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांचे आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीची व वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे केला आहे तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी अशी मागणी रोचकरी यांनी केली आहे. मंकावतीराव रोचकरी यांचे नावाने मंकावती कुंड आहे तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी अशी मागणी केली होती. मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचे हे कुंड असून हि वडिलोपार्जित मालमत्ता पुरातन काळातील असून माझी सातवी पिढीची या कुंडावर मालकी हक्कात नोंद असून कब्जेदार आहे. तरी या विहिर जागेचे सुशोभीकरण व बांधकाम करण्यास बांधकाम परवाना द्यावा अशी मागणी रोचकरी यांनी मंत्र्याकडे केली होती मात्र ती फेटाळून लावत रोचकरी बंधुवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.