दुसरी लाट – एप्रिल महिन्यात कोरोनाचा कहर व मृत्यूच तांडव
महिन्यात 17 हजार 813 रुग्ण तर 327 रुग्णांचा बळी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कोरोनाची दुसरी लाट ही सर्वात घातकी ठरत असुन पहिल्या लाटेच्या तुलनेत ती कोरोनाचा त्सुनामी ठरली आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाने कहर करीत एका महिन्यात 17 हजार 813 जणांना बाधीत केले तर 327 पेक्षा अधिक रुग्णांचा बळी घेत अक्षरशः मृत्यूच तांडव घातले. कोरोनाचे मागील संपूर्ण वर्षाचा आकडा एकीकडे तर दुसरीकडे एकटा एप्रिल महिना सर्वात घातकी ठरला . आजवरच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत एप्रिल महिन्यात 46.45 टक्के रुग्ण सापडले तर 35.36 टक्के मृत्यू झाले. पहिल्या लाटेच्या 3 महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी 131 पटीने वाढली. एप्रिल महिन्यात 29.10 टक्के तपासणी करण्यात आल्या त्यात 27.84 टक्के पॉझिटिव्हीटी दर राहिला तर उपचार नंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.45 टक्के राहिले. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या एका दिवशी तब्बल 900 रुग्ण सापडले त्यामुळे या वाढत्या आकडेवारीने सर्वांना धडकी भरवली.
एप्रिल 2021 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात 17 हजार 813 रुग्ण सापडले तर 327 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला ( यात सारीने मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश नाही ) उस्मानाबाद जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सरासरी दररोज 593 रुग्ण सापडले तर दररोज सरासरी 11 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची मागील 13 महिन्याची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर एप्रिल महिना प्रशासन व आरोग्य यंत्रणेसाठी परीक्षेचा व संयमाचा काळ ठरला तर रुग्ण आणि नातेवाईकांना तो त्रासदायक ठरला.
उस्मानाबाद जिल्ह्यात एप्रिल 2020 महिन्यात कोरोनाचे 3 रुग्ण सापडले त्यानंतर मार्च 2021 या एक वर्षाच्या काळात 20 हजार 535 रुग्ण सापडले तर 596 जणांचा कोरोनाने बळी घेतला मात्र एप्रिल 21 या एका महिन्यात तब्बल 17 हजार 813 रुग्ण सापडले तर 327 जणांचा कोरोनाने बळी घेतला त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अधिक घातक ठरली आहे. जिल्हयात कोरोनाचे आजवर 38 हजार 348 रुग्ण सापडले असून त्यापैकी एकट्या एप्रिल महिन्यात 17 हजार 813 म्हणजे आजवरच्या एकूण रुग्णाच्या 46.45 टक्के रुग्ण हे एप्रिल महिन्यात सापडले. एकाच महिन्यात इतके रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेवर व प्रशासनावर ताण आला मात्र त्यांनी उपलब्ध साधन सामुग्री व मनुष्यबळावर उपचार केले.
उस्मानाबाद जिल्ह्यात एप्रिल 2021 महिन्यात 17 हजार 813 रुग्ण सापडले त्यातील सर्वाधिक 48.04 टक्के म्हणजे 8 हजार 558 रुग्ण हे उस्मानाबाद शहर व तालुक्यातील होते त्यामुळे दुसऱ्या लाटेत उस्मानाबाद तालुका सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट ठरला. एप्रिल महिन्यात 12 हजार 728 रुग्ण म्हणजे 71.45 टक्के कोरोना उपचारनंतर बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 2 लाख 19 हजार 786 नागरिकांच्या तपासणी गेल्या 14 महिन्यात करण्यात आल्या त्यापैकी 63 हजार 961 म्हणजे 29.10 टक्के तपासणी ही केवळ एकट्या एप्रिल महिन्यात करण्यात आली. यात 53 हजार 970 रॅपिड अँटीजन व 9 हजार 991 आरटीपीसीआर तपासणीचा समावेश आहे. या टेस्ट पैकी 17 हजार 813 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले हे प्रमाण 27.84 टक्के आहे.
गेल्या वर्षी 2020 मध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्याच्या काळात पहिली लाट आली त्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 4 हजार 524, सप्टेंबर 6 हजार 488 व ऑक्टोबर 2 हजार 554 असे 3 महिन्यात 13 हजार 566 कोरोना रुग्ण सापडले तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात 3 हजार 246 रुग्ण व एप्रिल महिन्यात 17 हजार 813 असे विक्रमी रुग्ण सापडले. म्हणजे एकट्या एप्रिल महिन्यात 131 पटीने अधिक रुग्ण सापडले.
कोरोनाची महिना निहाय आकडेवारी
महिना कोरोना रुग्ण मृत्यू
एप्रिल 20 3 0
मे 20 68 2
जुन 20 149 9
जुलै 20 940 43
ऑगस्ट 20 4524 94
सप्टेंबर 20 6488 227
ऑक्टोबर 20 2554 152
नोव्हेंबर 20 1023 44
डिसेंबर 20 585 3
जानेवारी 21 576 0
फेब्रुवारी 21 379 7
मार्च 21 3246 15
एप्रिल 21 17813 327