चाचण्यांचे प्रमाण कमी झाले की कोरोनाच संपला, भाविकांची रॅपिड चाचणी गरजेची
आत्मिक समाधानासाठी आकडा बरा पुढे मोठे संकट
मंदिरात खुलेआम प्रवेश, 2 डोसचा नियम कागदावर
भाविक, व्यापारी व पुजारी हे बिनधास्त विनामास्क
एकमेकांवर चालढकल करण्यात प्रशासनाची धन्यता
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासह खास करून तुळजापूर तालुक्यासाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 8 दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ 208 रुग्ण सापडले त्यापैकी तुळजापूर तालुक्यात 4 रुग्ण सापडले आहेत. तुळजाभवानी देवीचा सध्या नवरात्र उत्सव सुरू असुन त्यात ही बाब कागदोपत्री आकडेवारीवरून दिलासादायक वाटत असली तरी तुळजापूर येथे सध्याची मंदिर परिसरातील स्तिथी पाहिली तर कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसते त्यामुळे आगामी काळात एक मोठे संकट निर्माण होऊ शकते. एका आठवड्यात तुळजापूर तालुक्यात 4 रुग्ण सापडले असुन त्यातील 4 दिवस एकही रुग्ण सापडला नाही हे विशेष. चाचण्यांचे प्रमाण कमी झाले की कोरोना संपला हा इथे संशोधनाचा विषय ठरेल. तुळजापूर तालुक्यात व तुळजाभवानी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची कोरोना चाचणीची केली जात नसल्याचे दिसते. रोज लाखो भाविक आले तरी बसस्थानक, मंदिर परिसरासह इतर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी किमान रॅपिड चाचणी होणे अपेक्षित असताना तसे प्रयत्न होताना दिसत नाही त्यामुळे आगामी काळात तपासणी वाढविणे गरजेचे आहे. आत्मिक समाधान म्हणुन ही आकडेवारी व चित्र बरे वाटत असले तरी तुळजापूर शहरासह जिल्ह्यात अनेक नागरिक विनामास्क गर्दी करीत आहेत, तुळजाभवानी मंदिर व शहरात तर देशभरातुन भाविक दर्शनासाठी येत आहेत , त्यांना कोरोना चाचणी व लसीकरण बाबत साधे कोणी विचारत नाही. तुळजापूरातील गर्दी आगामी काळात धोका ठरू शकते
उस्मानाबाद जिल्ह्यात 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या 7 दिवसांच्या काळात 11 हजार 205 नमुने तपासण्यात आले त्यापैकी 209 रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले,हा पॉझिटिव्हिटी दर 1.86 टक्के आहे. जिल्ह्यात आजवर 67 हजार 209 रुग्ण सापडले असून त्यातील 64 हजार 813 रुग्ण बरे झाले आहेत, रुग्ण बरे होण्याचा दर हा 96.43 टक्के आहे. जिल्ह्यात 63 हजार 535 रुग्णांपैकी 1 हजार 486 रूग्णांचा मृत्यु दर हा 2.33 टक्के आहे. उस्मानाबाद जिल्ह्या बाहेर 352 रुग्ण, ह्रदयरोग व इतर कारणांनी 107 तर पोस्ट कोविड गुंतागुंतमुळे 105 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 ऑक्टोबरला 1 हजार 663 नमुने तपासण्यात आले त्यापैकी 31 पॉझिटिव्ह आले त्यातील 2 तुळजापूर तालुक्यातील होते, 5 ऑक्टोबरला 1 हजार 287 नमुने तपासले त्यात 28 पॉझिटिव्ह सापडले त्यात 1 रुग्ण तुळजापूर येथील होता. 6 ऑक्टोबरला 1 हजार 980 नमुनेपैकी 37, 7 ऑक्टोबरला 1 हजार 687 नमुनेपैकी 32, 8 ऑक्टोबरला 1 हजार 749 नमुनेपैकी 31 तर 9 ऑक्टोबरला 1 हजार 568 नमुनेपैकी 31 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, त्यात 6 ते 9 ऑक्टोबर या सलग 4 दिवसात एकही रुग्ण तुळजापूर तालुक्यात सापडला नाही, खर तर हा एक प्रशासनासाठी दिलासादायक म्हणावा लागेल. 10 ऑक्टोबरला 1 हजार 271 नमुनेपैकी 19 पॉझिटिव्ह आले त्यातील 1 तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथील 34 वर्षीय युवक होता.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी कारवाईची माहिती जाहीर करावी
नेहमी कारवाईचा दंडुका उचलल्यावर जाग येणार का? स्वयंशिस्त व नियमाचे पालन तितकेच गरजेचे
तुळजाभवानी मंदिरात 10 वर्षाखालील बालकांना व 60 वर्षवरील ज्येष्ठ नागरिक यांना प्रवेश बंदी असताना याचे पालन होताना दिसत नाही. प्रवेश देताना भाविकांचे 2 डोस झाले आहेत का याची खातरजमा करणारी यंत्रणा कागदावरच कार्यान्वित दिसते.मंदिर परिसरात अनेक भाविक, व्यापारी, नागरिक व पुजारी हे विनामास्क वावरताना दिसतात मात्र कारवाई कोणत्या प्रशासकीय यंत्रणेने करायची यावर अजूनतरी अधिकाऱ्यात एकमत झालेले दिसत नाही. आरोग्य, गर्दीवर नियंत्रण, सुरक्षा, प्रवेश या विविध पातळीवरील जबाबदारी व कारवाईसाठी एकमेकांवर चालढकल करण्यात धन्यता मानली जात आहे, सर्व कारभार हे आई तुळजाभवानी देवीच्या कृपेवर अवलंबून आहे. अनेक नियम हे केवळ प्रशासकीय आदेशाचा भाग व आगामी काळात संकट आले तर त्यासाठी केलेली पूर्वनियोजित कागदोपत्री तरतुदी किंवा सोपस्काराचा भाग बनून राहिले आहेत. नवरात्र काळात कोरोना नियम मोडणाऱ्या किती जणांवर कारवाई केली याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर, नुतन पोलीस अधीक्षक निवा जैन यांनी जाहीर करणे आवश्यक आहे. मंदिर प्रशासन योग्य प्रकारे आतील नियोजन तर पोलीस प्रशासन बाहेरील गर्दीवर नियंत्रण करीत असले तरी कोरोना नियमांचे काय ? याचे उत्तर मिळणे अपेक्षीत आहे. तुळजापूर शहरातील सध्याची गर्दी ही आगामी काळात डोकेदुखी ठरू शकते.
प्रशासनाने शिस्त व नियम पाळण्यासाठी नेहमी कारवाईचा दंडुका उचलल्यावर लोक जागे होतात हा जरी आजवरचा अनुभव व लोकांची मानसिकता असला तरी कोरोना संकट काळात सर्वांनी स्वतः व कुटुंबासाठी स्वयंशिस्त व स्वतः नियमाचे पालन करणेही तितकेच गरजेचे आहे.