९ कोटी ५१ लाखांच्या अपहार प्रकरणी ४ स्वतंत्र गुन्हे ६ आरोपी , उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशानंतर कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
दैनिक समय सारथी वृत्तपत्राच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून बहुचर्चित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेत ९ कोटी ५१ लाखांच्या घोटाळा प्रकरणी ६ जणांच्या भ्रष्ट टोळीवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशनानंतर आनंद नगर पोलीस ठाण्यात शासकीय निधीचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी तथा तहसीलदार अभय मस्के, खासगी इसम मनोज औदुंबर मोरे यांच्यासह ४ ठेकेदारांच्या टोळीचा समावेश आहे. अध्या इंटरप्रायजेसचे प्रताप राजेंद्र गायकवाड, ई झोन इंटरप्रायझेसचे फहीम जलील शेख,पुणे बालेवाडी येथील ए वन इंटरप्रायजेस व मुंबई येथील ए टू झेड इंटरप्रायजेस अश्या ४ ठेकेदारावर गुन्हे नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यात ४ स्वतंत्र वेगवेगळे गुन्हे नोंद झाले असून त्यातील सर्वच्या सर्व ४ गुन्ह्यात अभय मस्के हे ठेकेदारासह आरोपी आहेत तर मनोज मोरे हा २ प्रकरणात आरोपी आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केल्यावर उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात जबाबदारी अंतीम करून फौजदारी गुन्हे नोंद केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील नायब तहसीलदार संतोष पाटील यांनी दिलेल्या ४ स्वतंत्र तक्रारीनुसार मस्के व त्यांच्या भ्रष्ट टोळीवर गुन्हा नोंद झाला आहे.या ६ जणांवर भा.दं.वि कलम ४२०,४०९,४६७,४६८,४७१,३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या चारही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड करीत आहेत.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद विभागाचे तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी अभय मस्के यांच्यासह भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीने जवळपास ९ कोटी रुपयांचा डल्ला मारल्याचे प्रकरण दैनिक समय सारथीने पुराव्यासह समोर आणले होते, त्यानंतर या प्रकरणी भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्याकडे या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती. औरंगाबाद विभागीय कार्यालयातील ५ जणांच्या चौकशी समितीने घोटाळ्यावर शिक्कामोर्तब करीत गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते तसेच त्यापूर्वी संबंधितांना नोटीस देऊन म्हणणे सादर करण्यास सांगितले होते त्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी ठेकेदारासह ११ जणांना नोटीस बजावून जबाबदारी अंतिम केली असून त्याप्रमाणे सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या ६ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय या भ्रष्ट टोळीमुळे बदनाम झाले होते मात्र अखेर जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी या टोळीचा बंदोबस्त केला. ही कारवाई भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी एक सूचक इशारा असून जिल्हाधिकारी दीपा मोधोळ मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची घाण काढून टाकण्यासाठी सुरु केलेल्या साफसफाई मोहीमेचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
प्रताप राजेंद्र गायकवाड यांच्या आध्या एटरप्रायजेसला दलित वस्ती योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन अधिकारी कार्यालयामार्फत लोहारा व उमरगा येथे खुली व्यायामशाळा बसविण्याचे २ कोटी ५० लाख रुपयांचे कंत्राट दिले होते व त्यापोटी २ कोटी ४८ लाख ६९ हजार १०० रुपये गायकवाड यांना देण्यात आले होते मात्र साहित्य पुरवठा न केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अभय मस्के व गायकवाड यांनी संगनमत करून शासनाच्या रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचे चौकशी अहवालात सिद्ध झाल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुंबई येथील ए टू झेड इंटरप्रायजेस या कंपनीला उस्मानाबाद जिल्हयातील सर्व नगर परिषद हद्दीतील स्मशानभुमीत विद्युतीकरण व्यवस्था करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी दिला होता मात्र अभय मस्के यांनी इकवीटास बँकेत जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता नियमबाह्य पद्धतीने बचत खाते उघडून मनोज औदुंबर मोरे या खासगी व्यक्तीशी संगनमत करून पैसे वर्ग केले तसेच सौरपथदिव्यांची गुणवत्ता व दर्जा न पाहता ४ कोटी देऊन शासनाची फसवणूक केली त्यामुळे ए टू झेड इंटरप्रायजेस , मस्के व मोरे या ३ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फयीम जलील शेख यांच्या ई झोन इंटरप्रायजेस या कंपनीला उस्मानाबाद जिल्हयातील सर्व नगर पालिका प्रशासकीय इमारती प्रांगणात सौर पथदिवे बसविण्याचे १ कोटी ३ लाख रुपयांचे कंत्राट दिले होते. यात सौर पथदिवे व सौर पॅक( सोलर इन्व्हर्टर ) यांचा समावेश होता मात्र याची गुणवत्ता व दर्जा न तपासता अभय मस्के व या कंपनीने संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अभय मस्के व शेख यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
पुणे बालेवाडी येथील ए वन इंटरप्रायजेस या कंपनीला उस्मानाबाद जिल्हयातील परंडा, उमरगा, नळदुर्ग व लोहारा नगर परिषदेतील अभिलेखे जतन करण्यासाठी कॉम्पॅक्टर बसविण्यासाठी १ कोटी ९९ लाख रुपयांचे कंत्राट दिले होते मात्र तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी अभय मस्के यांनी इक्विटास बँकेत मनोज मोरे याच्याशी संगनमत करून नियमबाह्य पद्धतीने खाते उघडले व ठेकेदाराने काम केलेले नसतानाही १ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम हडप केली त्यामुळे मोरे , मस्के व ए वन या तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.