दलाल, दरोडेखोर – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर पीक विमा, नेरुळ मेडिकल कॉलेजवरून जहरी टीका
खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांची पत्रकार परिषद
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील खरीप 2020 च्या पीक विम्याचा वाद चांगलाच रंगला असून दिवाळी पूर्वीच आरोपाचे राजकीय फटाके फुटत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2020 चा 531 कोटींचा पीक विमा मंजूर असताना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल करुन केवळ 200 कोटी रुपयांची मागणी केली. शेतकरी यांचे कैवारी म्हणून स्वच्छ प्रतिमा म्हणून आमदार राणा मिरवतात मात्र शेतकऱ्यांना बुडवायची त्यांची वृत्ती आहे. आमदार राणा हे विमा कंपनीचे एजन्ट, दलाल म्हणून काम करीत असून ते स्वच्छ पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर आहेत. आमदार राणा यांनी त्यांच्या या दुटप्पी भूमिकाबाबत स्वतः जाहीर उत्तर द्यावे असे सांगत शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमदार पाटील यांना आव्हान दिले.
आमदार राणा हे सत्तातरण पूर्वी सांगत होते की मुख्यमंत्री, कृषीमंत्री यांनी बैठक लावावी मात्र आता केंद्रात व राज्यात त्यांचे सरकार आहे मुख्यमंत्री पहाटे 6 पर्यंत काम करतात मात्र आता राणा गप्प का आहेत, त्यांची ही दुटप्पी भूमिका शेतकऱ्यांना माहित असून त्यांना जनता धडा शिकवेल असा विश्वास यावेळी व्यक्तq केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 हजार 208 कोटींची मदत दिवाळी पूर्वी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीने त्यानी दिला. पत्रकार परिषदेत आमदार राणा यांचे नाव घेऊन थेट टीका केली त्यामुळे आता आमदार राणा हे काय उत्तर देतात हे पाहावे लागेल.
एकही शेतकरी आत्महत्या होऊ देणार नाही असे सांगण्यात आले मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात जून पासून 37 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. अश्या स्तिथीत आमदार राणा हे विमा कंपनीला धार्जिन असे धोरण राबवित आहेत. शेतकऱ्याचे कैवारी म्हणून साळसूदपणाचा आव आणून मिरवायचे मात्र शेतकरी विरोधात केलेले हे महापाप नियती माफ करणार नाही.
आमदार राणा पाटील हे पीक विमा कंपनीचे दलाल म्हणून 2017 पासून काम पाहत आहेत असा आरोप केला. विमा कंपनी त्यांची जावाई आहे का ? कंपनीने नाही दिले तर सरकारने द्यायचे अशी भूमिका आमदार राणा यांची असून ते एजन्टगिरी करतात असे ते म्हणाले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी वैद्यकीय महाविद्यालय आणले मात्र आमदार राणा यांनी उस्मानाबादला मंजूर असलेले मेडिकल कॉलेज हे तेरणा ट्रस्टला घेऊन ते नेरुळ येथे नेले आता त्या महाविद्यालयला 100 वरून 150 अश्या जागा मंजूर झाल्या आहेत. या 50 जागा मिळण्यासाठी आमदार राणा यांना सत्ता हवी होती, या वाढीव 50 जागांच्या डोनेशनमधून येणारा करोडो रुपयांचा पैसा हाच यांच्यासाठी विकास असल्याचा आरोप केला.
उस्मानाबादला मेडिकल कॉलेज मंजूर होते याबाबत शिवसेना खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील यांनी पुरावा द्यावा असे आवाहन यापूर्वी आमदार राणा पाटील यांनी केले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले की नेरुळ येथील मेडिकल कॉलेज उस्मानाबादला आणण्यासाठी डॉ पदमसिंह पाटील किंवा आमदार पाटील यांनी का प्रयत्न केला नाही, त्यांना उस्मानाबाद बाबत आपुलकी असेल तर त्यांनी एकतरी पत्र दिले का हे सांगावे असे ओमराजे म्हणाले.