दरोडा टाकून खून केल्याचे प्रकरण – तुळजापूर येथील 5 आरोपीना 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, उस्मानाबाद कोर्टाचा निकाल
उस्मानाबाद – समय सारथी
ट्रक ड्राइवर व त्याच्या सहकाऱ्याला मारहाण करुन पैसे लुटून दरोडा टाकून खून केल्याप्रकरणी तुळजापूर येथील 5 जणांना उस्मानाबाद येथील जिल्हा न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2018 साली घडलेल्या या दरोडा व हत्याकांड प्रकरणी आरोपीना अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एस गुप्ता यांनी शिक्षा सुनावली आली आहे अशी माहिती अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी दिली. उस्मानाबाद पोलिस दलाने या प्रकरणात उत्कृष्ट तपास करीत पुरावे जमा केल्याने आरोपीना शिक्षा होऊ शकली.
तुळजापूर शहरातील हडको येथील लक्ष्मण ढवळे, नितीन हेडे व विकी कोरडे, मातंगनगर येथील अजय क्षीरसागर व वेताळनगर येथील खंडू कांबळे या पाच आरोपीना उस्मानाबाद कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.
फिर्यादी विजय कळबंडे हे पुणे येथील इंडस टॉवर कंपनी येथे कामाला होते. कळबंडे व त्यांचा सहकारी सोमनाथ कांबळे हे पुण्याहून औसा येथे साहित्य पोहचवण्यास आले व त्यानंतर ते साहित्य पोहचवून 15 सप्टेंबर 2018 रोजी उजनी येथून पुणे येथे जात असताना तुळजापूर येथील चौकात रात्री 10 वाजता थांबले. ते गाडीतून उतरल्यावर चावी कोणीतरी काढून घेतली त्यामुळे ते तिथेच थांबले. त्यावेळी काही तरुण हे अंडा बुर्जी गाडी मालक सोबत बिलावरून वाद घालत होते.
रात्री दीडच्या सुमारास अंडाबुर्जी दुकानदारसोबत वाद घालणाऱ्यापैकी एक मुलगा मोटारसायकल व इतर 4 मुले पायी चालत आले आणि सोमनाथ यांना लाथा बुक्क्यानी मारहाण करायला सुरुवात केली. फिर्यादी विजय कळबंडे याच्या खिशातील पॉकेट व 2500 रुपये आणि ओपो कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेला व फिर्यादीच्या मानेला धरून 50 हजार रुपयांची मागणी केली व जीवे मारण्याची धमकी दिली. सोमनाथ कांबळे याला मारहाण केली त्यात ते जखमी झाले. ही मारहाण पाहून फिर्यादी विजय यांनी पळ काढला व पोलिसांना घेऊन घटनास्थळी आले. त्यावेळी सोमनाथ हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर गुन्हा नोंद झाल्यावर पोलिसांनी आरोपीची ओळख परेड करुन त्यांना अटक केली व तपास करुन दोषारोप पत्र दाखल केले.
सुनावणी दरम्यान 7 साक्षीदार यांचा जबाब नोंदविण्यात आला. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी सादर केलेले पुरावे व केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून पाचही आरोपीना कलम 396 अन्वये दोषी ठरवून 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व 5 हजार रुपये दंड ठोठावला.