दणका – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ गलांडेंच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचे आरोग्यमंत्री डॉ सावंतांचे आदेश
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांच्या निलंबनाचा किंवा बदलीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे तोंडी आदेश आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ अर्चना भोसले यांना दिल्याची माहिती आहे.
पालकमंत्री डॉ सावंत यांनी डॉ गलांडे यांची खरडपट्टी करत म्हणाले की अशी नकारात्मक मानसिकतेचे अधिकारी या जिल्ह्यात नकोत, यांचा एकतर निलंबनाचा नाहीतर बदलीचा प्रस्ताव सादर करा. कारवाई केल्याशिवाय हे सुधारणार नाहीत असे म्हणत त्यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे नेमका कोणता प्रस्ताव जातो हे पाहावे लागेल. आरोग्य मंत्री डॉ सावंत यांनी यनिमित्ताने कारवाईचा दणका दिला आहे.
डॉ गलांडे यांच्या पदोन्नती घोटाळ्यासह बदली, परवाना, मान्यता यासह गैरकारभाराची व रुग्ण असुविधेची तक्रार होती. डॉ गलांडे यांचे काही निर्णय हे वादग्रस्त राहिले आहेत. जिल्ह्यात प्रतिनियुक्तीसाठी ठराविक रेटकार्ड असुन जोरदार वसुली झाल्याचीही चर्चा आहे. अनेक खासगी रुग्णालयात शासकीय सुविधा व योजनाची मान्यता देण्यासाठी प्रति बेड,दप्तर तपासणीसाठी एक रेटकार्ड असुन वसुलीची यंत्रणा कार्यरत आहे. जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन बंद असणे यासह अनेक रुग्ण असुविधासह तक्रारी आहेत या सर्वबाबीमुळे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश खुद्द पालकमंत्री डॉ सावंत यांनी दिले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी प्रतिनियुक्ती न देण्याबाबत लातूर आरोग्य उपसंचालक यांचे आदेश असतानाही प्रतिनियुक्तीचा बाजार मांडल्याचे समोर आले होते. उपसंचालक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अनेक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्ती दिल्याची माहिती आहे.
उमरगा येथून डॉ सूर्यवंशी यांची धाराशिव येथे बदली झालेली असताना, त्यांना पुन्हा उमरगा येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. डॉ सचिन देशमुख यांची तुळजापूरला बदली असताना पुन्हा धाराशिव येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. डॉ जगन्नाथ कुलकर्णी यांची उमरगा येथून बेंबळी येथे बदली झालेली असताना, पुन्हा उमरगा येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. डॉ भोरे यांची नळदुर्गला बदली झाली असताना, भूम येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.
प्रतिनियुक्ती सह अन्य बदल्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. याबाबतची बातमी दैनिक समय सारथी वृत्तपत्राने प्रकाशित केली होती.