तेरणा कृषी ड्रोन प्रशिक्षण केंद्र, उद्योगाची संधी – डॉ पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते उदघाटन
कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढणार, 100 सेवा केंद्र बनविण्याचा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा संकल्प
उस्मानाबाद – समय सारथी
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तेरणा कृषी ड्रोन प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार असून या केंद्राचे उदघाटन माजी गृहमंत्री तथा तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी पाडव्याच्या शुभेमुहूर्तावर सकाळी 11.30 वाजता तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे हा कार्यक्रम होणार आहे. कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर ही संकल्पना उस्मानाबाद जिल्ह्यात आमदार पाटील यांनी मांडली होती त्याला आता मूर्तस्वरूप येत आहे.
कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर क्रांतिकारी ठरणारा असून भविष्यात या क्षेत्रात मोठा वाव आहे. कीटकनाशक फवारणी, मॅपिंग, मल्टी स्पेकट्रम कॅमेराद्वारे पिकांचे सूक्ष्म निरीक्षण व रोगाचे पूर्वानुमान, जमिनीच्या मूलभूत घटकांचे मूल्यांकन यासाठी ड्रोन चा वापर अतिशय उपयुक्त आहे. केंद्र सरकार कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनच्या वापराबाबत अतिशय सकारात्मक असून ड्रोन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध घटकांसाठी 40% ते 100% अनुदान दिले जात आहे. शेती व्यवसायात मनुष्यबळाचा अभाव मर्यादा लक्षात घेता ड्रोन चा वापर ही काळाची गरज बनली आहे ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये 100 ड्रोन कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून आवश्यक मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबाद तेरणा दोन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शेतकरी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.