तेरणा कारखाना पुन्हा संकटात ? भैरवनाथने भरलेल्या साडे पाच कोटींचा पेच निर्माण
निविदा प्रक्रिया रद्द – तेरणा कारखाना बाबत डीएआरटी कोर्टाचा धक्कादायक निर्णय
उस्मानाबाद – समय सारथी
ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखानाबाबत डीआरटी कोर्टाने (कर्ज वसुली न्यायाधिकरण ) धक्कादायक निर्णय दिला आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याची निविदा प्रक्रिया रद्द ठरविली आहे तसेच निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे तेरणा कारखाना निविदा प्रकरणी जिल्हा बँक व भैरवनाथ उद्योग समूहाला मोठा झटका बसला आहे.
तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवायची झाली तर भैरवनाथ समूहाने भविष्य निर्वाह विभागाकडे भरलेल्या साडे पाच कोटी रुपये बँकेला परत द्यावे लागणार आहेत. जिल्हा बँकेची सध्या आर्थिक स्तिथी तितकी चांगली नाही त्यामुळे हे पैसे परत द्यायचे कसे हा पेच प्रसंग निर्माण होणार आहे. शिवाय भैरवनाथ पुन्हा कोर्टात गेली तर हा वाद कायदेशीर बाबीत अडकणार असल्याने तेरणा पुन्हा संकटात येणार आहे.
तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियाचा वाद ट्वेंटीवन शुगरने डीआरटी कोर्टात (कर्ज वसुली न्यायाधिकरण) दाखल केला होता त्यावर हा निर्णय देण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया राबविताना 15 दिवस कालावधी ऐवजी 12 दिवसांचा वेळ ठेवल्याने निविदा प्रक्रिया रद्द केली आहे.
31 जानेवारी 2022 पर्यंत डीआरटी कोर्टातील भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन शुगर फॅक्टरी यांच्यातील प्रकरण निकाली लावावे असा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गंगापूरवाले यांनी दिले होते.उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तेरणा कारखाना शिवसेना आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ उद्योगसमूहला 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता मिळाली होती मात्र आता ही प्रक्रिया रद्द केली आहे.