तृतीय पंथीयांना शासनाच्या सर्व योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे
धाराशिव – समय सारथी
तृतीय पंथीयांना समाजात जगताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण हा वर्ग समाजाने बहिष्कृत केल्यामुळे त्यांना इतरांसारखे जीवन जगता येत नाही. मात्र यांना सर्व सामान्यासारखे जीवन जगता यावे व विकासाच्या प्रवाहात आणता यावे यासाठी शासनाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी ज्या ज्या योजना असतील त्या सर्व योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केले.
धाराशिव तहसील लगत असलेल्या जुन्या सेतू सुविधा केंद्रातील तलाठी कार्यालयात तृतीय पंथीयांना शासनाच्या विविध योजना मिळाव्यात त्यासाठी नोंदणी करण्यासाठी तृतीय पंथीयांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत, उस्मानाबाद तहसिलदार डॉ शिवानंद बिडवे, एस.एन. भिसे (संजय गांधी निराधार योजना), नायब तहसिलदार (निवडणूक विभाग) शिल्पा कदम, प्रभारी नायब तहसिलदार प्रभाकर मुगावे (पुरवठा), सीमा वाघमारे, माया दामोदरे, तृतीय पंथी प्रतिनिधी हिना सय्यद, राजनंदिनी बनसोडे, छाया वैरागे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे म्हणाले की, तृतीय पंथीयांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी करून त्यांना समाज कल्याण विभागाचे ओळखपत्र मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यामध्ये ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज भरुन घेतले जाणार आहेत. तर 65 वर्षाच्या आतील लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. तसेच त्यांना पोर्टलद्वारे एका छताखाली बँकेचे पासबुक उघडणे, 21 हजार रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदार नोंदणी कार्ड आदी योजनांची नोंदणी करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
विशेष म्हणजे तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी धाराशिव शहराच्या लगत असलेल्या गट नंबर 17 मधील खुल्या जागेमध्ये स्वतंत्र स्मशानभूमी करण्यात येणार आहे. त्यासाठी संरक्षण भिंत बांधकाम, निवारा शेड व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धाराशिव, तुळजापूर, उमरगा व इतर ठिकाणी तृतीयपंथी व्यक्ती असतील तर त्यांची देखील नोंदणी करून त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते उघडलेले नाही अशांची खाती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत उघडण्यात येतील. त्यामुळे जिल्ह्यातील एक देखील तृतीयपंथी लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्ह्यातील तृतीयपंथी उपस्थित होते.