तुळजाभवानी मंदिर गाभारा प्रवेश व दर्शन नियम सर्वांना समान असावे
तुळजापूरमधील पुजारी कुटुंबियांच्या महिलांना पूजेची संधी द्या
उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी
पुणे – समय सारथी
महाराष्ट्राचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात काही विषयांवर स्थानिक नागरिकांकडून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार स्वरूपात आलेल्या माहितीवर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे याद्वारे तुळजाभवानी मंदिरात महिलांच्या हस्ते पूजा करण्याबाबत स्थानिक भोपे पुजारी कुटुंबातील महिलांची भावना लक्षात घेऊन याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनात त्यांनी मंदिरात सध्या प्रचलित असलेल्या नियमात आणि प्रथांमध्ये अनेक सुधारणा करणे आवश्यक असल्याचे म्हणटले आहे.
मंदिर गाभारा प्रवेश व दर्शन नियम सर्वांना समान असावेत. महिलांना गाभारा प्रवेश पूर्वीप्रमाणेच चालू ठेवावा. कोविड काळात बदललेले नियम पुन्ःस्थापित करावे. स्थानिक पुजारी भोपे कुटुंबियांच्या महिला प्रतिनिधींना या मंदिरात पूजा करण्याबाबत त्यांनी केलेल्या मागणीनुसार परवानगी देण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय होण्याची आवश्यकता आहे. देऊळनियमानुसार पुजारी घराण्यातील पुरुष व स्त्री पुजाऱ्यांना पुजेचे समान अधिकार असावेत. जिल्हाधिकारी स्तरावर मंदिर व गाभारा प्रवेशाचे नियम बदल करु नयेत.तसेच नियमांवली व पुजांचे प्रघात, वेळा यात पारदर्शकता तसेच सर्व भाविकांना समान नियम असावेत. गाभारा प्रवेशाबाबत,पुजाविधी यात स्त्री भाविकांना डावलले जाता कामा नये.
पंढरपूर देवस्थान विकास आराखड्याच्या धर्तीवर सर्व भाविक, पुजारी मंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, पुरातत्व विभाग, वास्तुविशारद ,माध्यम प्रतिनिधी, पोलीस, जिल्हा प्रशासन व मंदिर समिती यांनी एकत्रितपणे तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा तयार करून तो वित्तीय तरतुदी साठी शासनास पाठवावा. पूर्वापार चालत आलेल्या सर्व परंपरा व पुजा,नित्योपचार,त्यांचे हक्क यामध्ये भाविक, अभ्यासक यांना विश्वासात घेतल्याशिवाय बदल करण्यात येऊ नये. तुळजापूर येथील भक्त निवासासाठी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निधी आणि त्याच्या खर्चाबाबत सद्यस्थिती याची माहिती मिळण्याबाबत संबंधितांना सूचित करावे.
मंदिरात धार्मिक ज्ञान व रूढीपरंपरेची माहिती असलेला व्यक्तीची धार्मिक व्यवस्थापकपदी निवड करावी. उपविभागीय अधिकारी दर्जाचा प्रशासकीय व्यवस्थापक या पदावरती तात्काळ नियुक्ती करावी.सन २०१५ ते आजपर्यंतचा भोपे पुजारी यांच्या देविच्या दैनंदिन सेवेचा स्थगित असलेला मावेजा (मोबदला) चालू करावा यासाठी सचिव, विधी व न्याय विभाग जिल्हाधिकारी ऊस्मानाबाद तथा मंदिर समीती अध्यक्ष यांना शासन स्तरावरून आदेशित करण्याची मागणी केली आहे.