तुळजाभवानी देवीच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ – वर्षात 54 कोटींची भर, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या प्रयत्नांना यश
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या उत्पन्नात गेल्या एक वर्षात दुप्पटीने वाढ झाली असुन 2022-23 या एका वर्षात तब्बल 54 कोटी रुपयांची भर पडली आहे. सर्वाधिक 15 कोटी रुपयांचे उत्पन्न हे सशुल्क दर्शनातून मिळाले असुन सिंहासन व दानपेटीत 19 कोटीचे दान भाविकांनी तुळजाभवानी चरणी अर्पण केले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली.
तुळजाभवानी मातेच्या मंदीर संस्थांनाचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 कोटीने वाढले असुन 2021-22 या वर्षात 29 कोटी उत्पन्न मिळाले तर 2022-23 या वर्षात हे उत्पन्न वाढून थेट 54 कोटीवर गेले. 2021-22 मध्ये सशुल्क दर्शनातून 7 कोटी 89 लाख तर 2022-23 मध्ये सशुल्क दर्शनातून 15 कोटी 54 लाख मिळाले. सिंहासन व दानपेटीत 2021-22 साली 8 कोटी 70 लाख तर 2022-23 मध्ये 19 कोटी 72 लाख उत्पन्न मिळाले. उत्पन्नाबरोबरच भाविकासाठी विविध उपाययोजनासाठी खर्चाचे प्रमाणही वाढले. 2021-22 साली 10 कोटी 66 लाख खर्च झाला तर तो 2022-23 मध्ये 15 कोटी 63 लाख म्हणजे 5 कोटींचा अधिकचा खर्च झाला मात्र उत्पन्न 25 कोटीने वाढले.
जिल्हाधिकारी तथा संस्थांनाचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी भाविकांना सुलभ दर्शनासाठी दिलेल्या सुविधा व उपाययोजनामुळे हे उत्पन्न वाढले असुन याला विश्वस्त, पुजारी मंडळ, व्यापारी, स्थानिक नागरिक यांची साथ मिळाली.जिल्हाधिकारी स्वतः अनेक वेळा भेट देऊन आढावा घेतात. तुळजाभवानी मंदीर व परिसर, तुळजापूर शहराचा विकास आराखडा अंतीम टप्प्यात असुन अनेक सुविधामुळे उत्पन्न व पर्यटन विकास होणार आहे. दर्शन मंडप,परिसर सुशोभीकरण यासह अनेक कामे होणार आहेत.
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,तेलंगणा, गुजरातसह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. देवी दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा व सुट्याच्या दिवशी मोठी गर्दी असते तर वर्षभरात तुळजाभवानी मातेचे शाकंभरी व शारदीय नवरात्र उत्सवासह चैत्र आणि अश्विन पौर्णिमेला लाखोंची मोठी यात्रा भरते.देवीच्या दर्शनासाठी 500 रुपये शुल्क आकारून थेट दर्शन दिले जाते तर इतर सशुल्क दर्शनासाठी 200 रुपये आकारले जातात शिवाय अभिषेक व सिंहासन पूजेतून लाखो रुपयांचे उत्पन्न होते.
160 किलो शुद्ध सोने तर हजारो किलो चांदी
भक्तांनी तुळजाभवानी चरणी अर्पण केलेल्या सोने चांदीची मोजदाद प्रक्रिया जुन महिन्यात पूर्ण झाली असुन यामध्ये 2009 पासून 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी सापडली आहे तर 354 हिऱ्यांचा देखील यात समावेश आहे. 15 दिवस ही प्रक्रिया चालली असून 25 लोकांकडून ही मोजदाद करण्यात आली आहे तसेच काही चांदीच्या मोठ्या आकाराच्या वस्तूंची मोजदाद करता आलेली नाही. 2009 पूर्वी देवीला 81 किलो सोन्याचे दान करण्यात आले होते. त्यानंतर हे सोने वितळविण्यात आले होते त्यावेळी 47 किलो सोने हे शुद्ध/प्युअर असल्याचे आढळून आले होते, हे सोने सध्या आरबीआयकडे डिपॉझिट करण्यात आले आहे. 2009 वर्षानंतरच्या 207 किलो सोने पैकी 111 किलो शुद्ध सोने मिळू शकते अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली. देवीकडे जवळपास 160 किलो शुद्ध सोने जमा झाले आहे.