‘आई साहेब’ व ‘आई राजा उदो उदो’ ची रोषणाई , भक्तांची पाहण्यास गर्दी
तुळजापूर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव जवळ असल्याने मंदिर प्रशासनासह नगर परिषद व पोलीस विभागाची तयारी जोरात सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवात तुळजाभवानी देवीच्या राजे शहाजी महाराज व जिजाऊ महाद्वार यासह मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवीच्या महाद्वारावर ‘आई साहेब’ व ‘आई राजा उदो उदो’ असे विविध आकर्षक रोषणाईने लिहले आहे. तुळजाभवानी व तुळजापूर मंदीर हे रोषणाईने नटले असुन ही आकर्षक रोषणाई कॅमेरात कैद करण्यासाठी व पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. मंदिर समोरील भाग हा सध्या सेल्फी पॉईंट ठरत आहे.
पुणे येथील श्री देविभक्त उंडाळे व टोळगे बंधुची श्री तुळजाभवानी मातेवर अपार श्रध्दा असल्याने गेली 7 वर्षापासून ही मंडळी मंदीर परिसरात आकर्षक रोषणाई सेवा म्हणून देवीच्या चरणी अर्पण करतात. ही सेवा ते कोणताही आर्थिक मोबदला तुळजाभवानी मंदीर संस्थान कडुन न घेता करत आहेत.तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवातील ही विद्युत रोषणाई आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरणार आहे. तुळजाभवानी देवी ही भक्तांची आई असल्याने देवीला ‘आई साहेब’ असे आदराने व भक्तीने भाविक हाक मारतात तर देवीची पूजा करण्यापूर्वी व कोणतेही शुभ काम करताना ‘ आई राजा उदो उदो’ असा जागर भाविक करीत असतात त्यामुळे याची रोषणाई करण्यात आली आहे.
पुणे येथील विजय उंडाळे,नितीन उंडाळे, संजय टोळगे व सोमनाथ टोळगे हे देविभक्त २०१४ पासुन श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात संपुर्ण मंदीरावर आकर्षक अशी विद्युत रुषणाई रुपी सेवा करीत आहेत.विजय उंडाळे यांनी २०१३ ला श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानला चांदीची उत्सव मुर्ती अर्पण केली होती.यंदा लाईटइफ्ट असणारी विद्युत रोषणाई अर्पन करण्यात आली त्याचबरोबर देवी गाभा-यात गाभारा गरम न होणारी पावर फुल्ल लाईट बसविण्यात येणार आहे तर निंबाळकर दरवाजा, कुंडावर व परिसरात रोषणाई केली जाणार आहे.
कोरोना संकटामुळे गेली वर्षभरापासुन बंद असलेली मंदिरे सुरू होणार असल्याने भाविक, पूजारी व व्यापारी आनंदी आहेत. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीसह अन्य मंदिरे नवरात्रच्या पहिल्या दिवसापासून सूरु होणार असल्याने गर्दी वाढत आहे तर देवीच्या दर्शनाची भाविकांना आतापासूनच ओढ लागली आहे. मंदिर रोषणाई कॅमेरात टिपण्यासाठी भाविक येत आहेत.
गेली सात वर्षापासुन दरवर्षी नवीन विद्युत रोषणाई केली जाते. जुनी विद्युत रोषणाई साहित्य उंडाळे-टोळगे हे गावी न नेता सार्वजनिक देविमंडळे मंदीर यांना मोफत देतात.आजपर्यत कर्नाटकातील विजापूर,अहमदनगर,लातूर,बार्शी उदगीर येथील मंडळाना दिली आहे.
तुळजाभवानी देवीचे मंदिर वर्षानंतर खुले होणार असल्याने व त्यातच देवीचा मुख्य नवरात्र उत्सव असल्याने भाविक लाखोंच्या संख्यने तुळजापूरात येणार आहेत त्यामुळे कमी वेळेत नियोजन करणे प्रशासनासाठी तारेवरची कसरत व एक आव्हान ठरणार आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक निवा जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील,नगराध्यक्ष सचिन रोचकरी,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार योगिता कोल्हे,सौदागर तांदळे,पोलीस निरीक्षक अजीनाथ काशीद,धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यासह महंत व पूजारी मंडळाचे पुजारी प्रयत्न करीत आहेत.