तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने गहाळ प्रकरण – खुलासा सादर करण्याचे आदेश, अंतीम संधी
काही दागिने गायब तर काही दागिन्याचे वजन आश्चर्यकारकरित्या वाढले – अंतीम अहवाल आठवड्यात
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या डब्यातील पुरातन दागिने मोजदाद प्रकरणी येत्या आठवड्यात अंतीम अहवाल येण्याची शक्यता आहे. तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने गहाळ प्रकरणी एका महंतासह तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक व इतर काही मानकरी यांना अंतीम खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दागिने मोजणी प्रक्रिया पुर्ण झाली असुन काही दागिने कमी आढळले असुन ज्यांच्याकडे त्याचा ताबा होता त्यांना नैसर्गिक न्यायतत्वानुसार खुलासा करण्यासाठी अंतीम संधी दिली आहे त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
काही सोन्याची दागिने व चांदीच्या वस्तू गायब आहेत तर काही दागिन्याचे वजन आश्चर्यकारकरित्या वाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक राजघराण्यानी देवीला अर्पण केलेल्या नाणे चोरी प्रकरणी यापूर्वीच गुन्हा नोंद झाला असुन त्यात एकही नाणे पोलिसांना तपासात हस्तगत झाले नाही, ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.