तुळजाभवानी देवीची ‘धन्वंतरी’ रुपात पुजा – कपाळी हळदी कुंकवात डॉक्टर यांचे चिन्ह
कोरोना संकटातून मुक्ती देण्याची भवानी चरणी प्रार्थना
तुळजापूर- समय सारथी ( कुमार नाईकवाडी )
जगावरील कोरोना रुपी संकट दूर व्हावे यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धन्वंतरी रुपात विशेष पुजा करण्यात आली यावेळी तुळजाभवानी देवीच्या मस्तकी (कपाळावर) डॉक्टर यांचा लोगो ( बोधचिन्ह) हळदी कुंकवात काढण्यात आले. देवीला डॉक्टर रुपात पुजा करून कोरोना मुक्तीची प्रार्थना करण्यात आली.
तुळजाभवानी देवीची दररोज पूजा करताना देवीच्या मस्तकी कपाळी हळदी कुंकवाने विविध प्रकारचे चिन्ह काढले जातात यात कधी ओम,श्री, कमळ, त्रिशूल, स्वस्तिक , सूर्य, शंख , मोर या हिंदू प्रतीक व धार्मिक चिन्हासह इतर सणवारानुसार व प्रासंगिक संदेश देणारी आकर्षक चिन्ह महंत व पुजारी नित्य नियमित काढत असतात. तुळजाभवानी देवीची सकाळी व रात्री प्रक्षाळ पूजेवेळी कपाळी वेगवेगळी चिन्ह हळदी कुंकवाचा वापर करून दररोज 2 वेळा काढली जातात यामुळे देवीचे रूप आकर्षक दिसते व रोज अभिषेक, पुजा , आरती केली जाते असे महंत तुकोजीबुवा यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यासह जगभरात कोरोनाने थैमान घातले असून हे संकट देवीने तुळजाभवानी देवीने धन्वंतरी रुपात डॉक्टर बनून दूर करावे अशी प्रार्थना करण्यात आली , ज्या वेळी मानवावर संकट आले त्यावेळी तुळजाभवानी देवीने त्यांच्या हाकेला धावुन संकटमुक्ती केली त्याचप्रकारे या कोरोना संकटात मुक्तीसाठी देवीला आज डॉक्टर रुपात सजविण्यात आले असल्याचे महंत तुकोजी बुवा यांनी सांगितले.
कोरोना संकटामुळे तुळजाभवानी देवीचे मंदिर सध्या बंद असून भक्तांना ऑनलाइन दर्शन घ्यावे लागत आहे, तुळजाभवानी देवीच्या या धन्वंतरी रूपातील दर्शन अनेक भक्तांनी फोटो व ऑनलाईन माध्यमातून घेतले आणि प्रार्थना केली, संकट दूर व्हावे यासाठी आज देवीची धन्वंतरी रुपात पूजा करण्यात आली असे मंदिर संस्थांनच्या तहसीलदार योगीता कोल्हे यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांनी मास्क , सुरक्षीत अंतर व सॅनिटायझर म्हणजे स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
डॉक्टर यांचा लोगो हा 3 भागात बनला असून त्यात उभा रॉड हा ग्रीकमधील गॉड ऑफ मेडीसीन म्हणजे औषधांची देवता इस्केपीलियस यांच्यापासून घेतली आहे तर वर जे पंख आहेत तर डोव्ह या पांढऱ्या रंगाच्या पक्षीचे असून ते शांतीचे प्रतीक आहेत.डॉ आपले काम शांतीच्या मार्गासाठी करतात व तो संदेश जगाला देतात व एकमेकांना पाहणारे साप ( संकटाचे प्रतीक म्हणून साप ) हे ध्यान केंद्रीत करत आहेत , कोणतेही संकट आले तरी न डगमगता ध्यान केंद्रीत करून अविरत कार्य करण्याचा संदेश ते देतात. डॉक्टर यांचे हे चिन्ह जगभर पूर्वीपासून वापरले जाते.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संकट मोठे असून उपलब्ध मर्यादीत सुविधा, सामुग्री व मनुष्यबळावर डॉक्टर कोरोना संकटाशी रात्रंदिवस लढा देत असून यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. या काळात डॉक्टर यांचे कार्य व योगदान महत्वाचे ठरले आहे. या संकटात लढताना अनेक डॉक्टर व त्यांचे कुटुंबातील सदस्य शाहिद झाले आहेत तरी हे कार्य अविरत सुरूच राहील , त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील व इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सचिन देशमुख यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना स्तिथी –
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 2 लाख 24 हजार 394 नमुने तपासले त्यापैकी 39 हजार 501 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 30.45 टक्के आहे. जिल्ह्यात 31 हजार 670 रुग्ण बरे झाले असून 80.63 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 950 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.37 टक्के मृत्यू दर आहे. जिल्ह्यात सध्या 6 हजार 881 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वाढता आलेख –
21 एप्रिल – 667 रुग्ण – 23 मृत्यू
22 एप्रिल – 719 रुग्ण – 21 मृत्यू
23 एप्रिल – 719 रुग्ण – 16 मृत्यू
24 एप्रिल – 810 रुग्ण – 20 मृत्यू
25 एप्रिल – 569 रुग्ण – 16 मृत्यू
26 एप्रिल – 720 रुग्ण – 17 मृत्यू
27 एप्रिल – 728 रुग्ण – 05 मृत्यू
28 एप्रिल – 872 रुग्ण – 11 मृत्यू
29 एप्रिल – 783 रुग्ण – 18 मृत्यू
30 एप्रिल – 900 रुग्ण – 19 मृत्यू
1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
2 मे – 486 रुग्ण – 9 मृत्यू