तुळजापूरात भाविकाकडून भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या 5 जणावर गुन्हे नोंद – जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांच्या आदेशानंतर पहिल्यांदाच ठोस कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या परिसरात बालकांना भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा तुळजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी याप्रकरणी बैठक घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्यावर गुन्हे नोंद झाले आहेत. मंदिर परिसरात अनेक बाल भिक्षुकरी असल्याची वारंवार तक्रार येत असल्याने ठोस कारवाई करण्यात आली आहे. पहिल्यांदाच तुळजापूर येथे अश्या स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. टास्क फोर्स स्थापन करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.
तुळजाभवानी मंदीर महाद्वारासमोर 6 ते 12 वयोगाटातील बालकांना येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांकडून भिक मागण्यासाठी प्रवृत्त केले प्रकरणी बालकाची काळजी व संरक्षण अधिकनियम कलम – 76 व महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंधक अधिनियम कलम- 11 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
डिकमल पारधी पिढी येथील गोरख काळे, सुमन काळे, शहाजी काळे, कोंडाबाई पवार, कोंडाबाई काळे व तुळजापूर येथील- उमाबाई शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तुळजापुर तीर्थक्षेत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीक मागणाऱ्याची वाढती संख्या पाहता यावर प्रशासकीय कार्यवाही व्हावी आणि बाल भिक्षेकरी यांना शैक्षणिक प्रवाहात आणले जावे यासाठी समाजसेवक संजयकुमार बोंदर अनेक वर्षांपासून लढा देत आहेत यावर प्रथमच मोठ्या कार्यवाहीची भूमिका जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन, नगर परिषद, महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ड लाईन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक संपन्न झाली होती त्यावेळी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश आर. एस. गुप्ता,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी न्यायाधीश वसंत यादव, महिला व बालकल्याण अधिकारी सुनील अंकुश, सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार बोंदर, तहसीलदार सौदागर तांदळे, विशाखा समिती जिल्हा अध्यक्ष बाबई चव्हाण, अनिल चव्हाण, नगर परिषद अधीक्षक वैभव पाठक, कामगार अधिकारी जी बी काकडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, बाल कल्याण समिती अध्यक्ष विजयकुमार माने, महिला पोलीस उप निरीक्षक आर. पी मंजुळे, गट शिक्षण अधिकारी एम. ई. माने आदींची उपस्थिती होती.