तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यावर गुन्हा नोंद – जातीवाचक शिवीगाळ केल्याचे प्रकरण
धाराशिव – समय सारथी
जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह एकावर आनंद नगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यलगट्टे यांच्यावर यापूर्वी भंगारचोरी, बोगस कागदपत्रे आधारे बांधकाम परवाना देणे, फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर बँक खाते व चेक याची माहिती न दिल्याने आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान यलगट्टे यांचा शोध घेऊन अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
आनंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की, धाराशिव येथील नवजीवन शिक्षण संस्थेच्या नावाने असलेल्या जागेत राजू विनोद बग्गा यांनी अतिक्रमण करीत तिथे जाणारा 15 फुट रस्ता बंद केला. याची तक्रार तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे यांच्याकडे दिली असता त्यांनी ती स्वीकारली नाही त्यानंतर अरुण माने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. सुनावणीनंतर रस्ता खुला करुन देण्याचे आदेश दिले असतानाही रस्ता खुला करुन दिला नाही उलट जातीयवाचक शिवीगाळ केली. त्यावरून राजू विनोद बग्गा यांच्यासह यलगट्टे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.