मुंबईतील अतुल अग्रवाल अजुनही मोकाट – अभय, वरदहस्त कोणाचा ? 14 फरार आरोपीना अटक कधी ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज प्रकरणावर आमदार कैलास पाटील यांनी पावसाळी विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवला, तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील मुंबई येथील तस्कर अतुल अग्रवाल हा मोकाट असुन धाराशिव पोलिसांनी कारवाई केली नसल्याची बाब निदर्शनास आणुन देत यावर सरकारने उत्तर द्यावे. विधीमंडळात ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात आरोपीवर मकोका लावण्यासाठी कायदा करणारे विधेयक मांडण्यात आले त्यावर चर्चेवेळी मत मांडताना आमदार कैलास पाटील यांनी ड्रग्ज तस्करी, गुन्हे, आरोपीची कार्यपद्धती, कायद्याच्या पळवाटा व होणारा दुरुपयोग यावर प्रकाश टाकला. कमर्शियल सोबतच इंटरमिडीयेट (मध्यम) क्वांटिटी सापडल्यास व यापुर्वी ड्रग्ज तस्करीचे गुन्हे असतील तर त्यांच्यावरही मकोका लावावा अशी भुमिका मांडली. सरकारने खुप चांगले विधेयक मांडले असुन त्याबद्दल सरकारचे स्वागत करीत अभिनंदन केले. ड्रग्जसोबतच दारू, हातभट्टी व गुटखा तस्करीत वारंवार सहभागी असलेल्या आरोपीवरही मकोका लावावा व त्याचा समावेश विधेयकात करावा असे ते म्हणाले.
कमर्शियल क्वांटिटी (50 ग्रॅम पेक्षा जास्त) ड्रग्ज सापडले तर मकोका लावाणार अशी सरकारची प्रस्तावित विधेयकात भुमिका आहे, मात्र गुन्हेगार तस्करी करताना 50 ग्रॅम पेक्षा जास्त होऊ देत नाहीत, त्यांना कायदा व त्यातील पळवाटा माहिती असतात. 2 ग्रॅम पेक्षा कमी असेल तर स्मॉल अर्थात अल्प, 2 ते 50 ग्रॅम पर्यंत इंटरमीडियेट मध्यम व 50 ग्रॅम पेक्षा जास्त असेल तर कमर्शियल व्यवसाय असे 3 प्रकार आहेत. ड्रग्ज तस्कर यांना हे माहिती आहे त्यामुळे ते 50 ग्रॅम पेक्षा जास्त ठेवत नाहीत. राज्यात 11 हजार गुन्हे कमर्शियल प्रकारचे आहेत व 63 हजार अल्प प्रमाणाचे आहेत. वारंवार तेच लोक गुन्हे करतात त्यांना सुद्धा मकोका अंतर्गत समाविष्ट केले पाहिजे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर येथे गेली अनेक वर्षापासुन ड्रग्ज तस्करी सुरु होती. पोलिसांनी 14 फेब्रुवारीला 59 पुड्या ड्रग्ज पकडले त्याचे वजन 45 ग्रॅम होते, त्यानंतर त्याचं गुन्ह्यात 4 मार्चला 10 ग्रॅम वजनाच्या 17 पुड्या व 5 मार्चला 8 ग्रॅम वजन असलेल्या 13 पुड्या पकडल्या, अशी 3 वेळा कारवाई झाली (63 ग्रॅमच्या 89 पुड्या) एका वेळी कमर्शिअल कॉन्टिटी येऊ दिली नाही. आपणं खुप चांगले कायदे करतो मात्र त्यात पळवाटा काढणारे गुन्हेगार आपल्या पुढचे आहेत, पोलिसांना हाताशी धरले जाते. एक पुडी 1 ग्रॅमची असेल ना मग 45 ग्रॅम कसे झाले असा सवाल उपस्थितीत केला.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत आरोपी असलेले मुंबई येथील ड्रग्ज तस्कर संगीता गोळे व वैभव गोळे यांच्यावर यापुर्वी सुद्धा ड्रग्ज तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. तपासात तुळजापूर, सोलापूर, मुंबई असे नेक्सस समोर आले आहे. 4 महिन्यापुर्वी आरोपीच्या जबाबात व दोषारोप पत्र कागदपत्रेमध्ये मुंबई येथील अतुल अग्रवाल याचे नाव समोर आले आहे, त्यांचे नाव व मोबाईल नंबर जबाबात आहे, त्यावर एकदा फोन केला तर तो मोबाईल सुरु आहे, तो खुलेआम फिरतोय, हे जाळे संपवायचे असेल तर त्याच्या पर्यंत पोलीस का गेले नाहीत याचे उत्तर दिले पाहिजे असे आमदार कैलास पाटील म्हणाले.
यापुर्वी देखील खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज तस्करीत मुंबई येथील अतुल अग्रवाल व सोलापूर येथील पिट्टा सुर्वे याचे नाव घेतले होते, त्यावेळी त्यांनी दोषारोप पत्रातील काही कागदपत्रे व पुरावे मांडले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोघांनी भेटून निवेदन दिले होते, त्यातील सुर्वे याला अटक केली असुन अग्रवाल याला आरोपी केले नाही किंवा पकडले नाही. अग्रवालच्या डोक्यावर कोणाचा हात आहे असा संशय व्यक्त होत आहे. दोषारोपपत्रात नावाचा उल्लेख, मुख्यमंत्री यांना निवेदन,विधीमंडळात आवाज उठवूनही अग्रवाल मोकाट आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 38 पैकी अजुनही 14 आरोपी फरार आहेत, त्यांना अटक कधी करणार हा प्रश्न आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.
परंडा येथील गुन्ह्यात ड्रग्ज म्हणुन कारवाई केली मात्र त्यांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीत पाठवताना ते होमगार्डमार्फत पाठवण्यात आले, त्याचा अहवाल कॅल्शियम क्लोराईड असा आला, अहवाल कोन बदलला, ब समरी कोर्टात दिली त्यानंतर पुन्हा चौकशी करायची भुमिका घेतली. कायदा कितीही चांगला केला तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा चांगली असेल तर कायदा बनवायला अर्थ आहे. एका गुन्हेगार यांचे नाव ड्रग्ज तस्करीत 2 पेक्षा अधिक वेळा आले की त्याला मकोका लावला पाहिजे तरच याला आळा बसेल. आमदार अभिमन्यू पवार म्हणाले प्रमाणे आमच्या ग्रामीण भागात दारू, हातभट्टी प्रमाण जास्त आहे. आरोपीला अटक केली की लगेच कारवाई करुन सोडून दिले जाते, तेचं ते लोक वारंवार गुन्हे करतात म्हणुन दारू, हातभट्टी व गुटखा तस्करीचा यात समावेश करुन मकोका लावावा अशी मागणी विधीमंडळ भाषणात केली.