डॉ शेंडगे यांच्यावर गुन्हा नोंद होणार का ? आधी लुट नंतर पैसे परत
उच्च न्यायालयातील अटकपुर्व जामीन अर्ज घेतला परत
उस्मानाबाद – समय सारथी
रुग्णांची आर्थिक लूट व विमा कंपनीसह सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी डॉ आर डी शेंडगे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. उमरगा सत्र न्यायालयाने डॉ शेंडगे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्यानंतर त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता मात्र उच्च न्यायालयात जामीन मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी अटकपूर्व जामीन याचिका मागे घेतली आहे. डॉ शेंडगे यांना आता पोलिसांना शरण येऊन अटक झाल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. गेल्या इतक्या दिवसापासून शेंडगे हे फरार असुन पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.दरम्यान रूग्णांची लुट करून नंतर पैसे परत करणाऱ्या डॉ शेंडगे यांच्यावर गुन्हा नोंद होणार का ? याकडे लक्ष लागले आहे.
डॉ आर डी शेंडगे यांची अटकपूर्व जामीन अर्ज उमरगा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी के अनभुले यांनी २६ आक्टोबर रोजी फेटाळून लावला. डॉ शेंडगे हे गुन्हा दाखल झाल्यापासुन 12 ऑक्टोबरपासुन फरार आहेत.
रूग्णांची आर्थिक फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा दिल्याचे प्रकरण चौकशी समितीत उघड झाल्यानंतर डॉ आर डी शेंडगे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला तेव्हा पासून ते फरार आहेत, त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला होता मात्र त्यांना दिलासा मिळत नसल्याचे दिसत आहे. बनावट कागदपत्रे तयार करून रुग्णांची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे यांच्यासह तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सहायक पोलिस निरीक्षक गोरे करीत आहेत.डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले
डॉ शेंडगे हे रुग्णाचे नाव व कोडवर्डच्या खुणा चिट्ठीवर करून द्यायचे, एक बाण, दोन बाण , तीन बाण वरच्या बाजूला असल्यास सादर रुग्णाचे ब्लड रिपोर्ट अहवाल हे वाढवून द्यायचे व खाली बाण केलेला असल्यास त्याचे तपासणी निष्कर्ष कमी द्यायचे असे सांकेतिक भाषेत ठरले होते. प्लस चिन्ह लिहल्यास पॉझिटिव्ह व मायनस चिन्ह लिहल्यास निगेटिव्ह असे समजून तसे रिपोर्ट देण्यास भाग पाडत असत. असा चौकशी अहवाल डॉ आर यु सूर्यवंशी, डॉ सीमा बळे व डॉ रोचकरी यांच्या त्रिसदस्यीय समितीने दिला होता.
कारवाई टाळण्यासाठी लुटीचे पैसे परत ? यात गुन्हा नोंद होणार का ?
उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलने रुग्णाकडून घेतलेले अतिरिक्त बिलाचे 1 लाख 34 हजार परत केले आहेत. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी रुग्णांच्या आलेल्या तक्रारीनंतर शेंडगे रुग्णालयाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची संलग्नता रद्द करण्यासह रुग्णालयाची परवानगी रद्द करण्याची लेखी शिफारस केल्यानंतर कार्यवाही टाळण्यासाठी हे पैसे परत केले आहेत.
शेंडगे रुग्णालयाने एकाच प्रकारची चूक वारंवार केली असल्याचे निदर्शनास आले असल्याने या रुग्णालयाची महात्मा ज्योतिबा फुले योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची संलग्नता रद्द करणे व रुग्णालया विरुद्ध तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे त्यानुसार रुग्णालयााचे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा 2006 अंतर्गत परवाना रद्द करणे यासाठी कार्यवाहीची शिफारस जिल्हाधिकारी तथा फुले योजनेचे जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली होती मात्र तक्रारी व कारवाईच्या कचाट्यातून सुटका होण्यासाठी रक्कम परत केली मात्र रूग्णांची केलेल्या फसवणुकीचे काय ? यात गुन्हा नोंद होणार का ? हा प्रश्न समोर येत आहे.