डॉ शेंडगे उस्मानाबाद पोलिसांवर भारी – गेली 10 महिन्यापासून फरार राहण्यात यशस्वी
उस्मानाबाद – समय सारथी
रूग्णांची आर्थिक फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा देऊन त्यांची आणि शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे हे गेली 10 महिन्यापासून फरार आहेत. डॉ शेंडगे याचा दैनंदिन व्यव्हार सुरुळीत असून उमरगा येथील काही जणांना डॉ शेंडगे यांचे अधूनमधून दर्शन होते मात्र ते पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून त्यांना अभय कोणाचे हा प्रश्न विचारला जात आहे.
फरार आरोपीचा आढावा प्रत्येक क्राईम मीटिंगमध्ये खुद्द पोलिस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकारी घेत असतात. त्यानुसार फरार आरोपीना शोधण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या आणि रणनीती ठरवली जाते मात्र या सर्वाना शह देत डॉ शेंडगे हे पोलिस यंत्रणावर वरचढ ठरत फरार राहण्यात यशस्वी ठरले आहेत, असेच म्हणवे लागेल.
चुकीची वैद्यकीय सेवा लुटीतील व विविध योजनाच्या नावाने शासनाचे लाखो रुपये लुटणाऱ्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार व आरोपी डॉ आर डी शेंडगे हे 12 ऑक्टोबरला गुन्हा नोंद झाल्यापासुन फरार आहेत.डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले असे चौकशी अहवालात उघड झाल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेंडगे यांची अटकपूर्व जामीन 2 वेळेस जिल्हा सत्र न्यायालयाने तर 2 वेळेस औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणात डॉ शेंडगे विरोधात कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले असून गेल्या 10 महिन्याच्या काळात 3 तपास अधिकारी बदलले, पोलिस अधीक्षक बदलले तरी ते डॉ शेंडगे यांना अटक करू शकले नाहीत. डॉ शेंडगे हे पोलिसांना सापडत नसल्याने उस्मानाबाद पोलिस दलाचे खच्चीकरण होत आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील नियम बदलांची गरज – आधी रुग्णांना लुटायचे नंतर परत द्यायचे
शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने रुग्ण सरोजाबाई बळीराम कांबळे या रुग्णाला आयसीयूमध्ये ऍडमिट केल्याचे भासवून योजनेतून पैसे लाटले. रुग्ण याकूब आलुरे यांच्याकडून योजनेतून उपचार देऊनही त्यांच्याकडून 12 हजार 180 रुपये अतिरिक्त आकारले तसेच रुग्ण सुलताना सैफन शेख यांच्याकडून 30 हजार व रुग्ण विजय भीमा जाधव यांना योजनेत उपचार देऊन सरकारकडून पैसे घेतले व रुग्णाकडूनही रोख 92 हजार घेतले. शेंडगे रुग्णालयाचे हे कृत्य महात्मा फुले योजनेच्या कलम 6.1,6.2 , 27.1 (सेवा स्तर करार) यांचे उल्लंघन असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी मार्च 2021 मध्ये दिला होता.
डॉ शेंडगे रुग्णालयाची महात्मा ज्योतिबा फुले योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची संलग्नता रद्द करणे व रुग्णालया विरुद्ध तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे त्यानुसार रुग्णालयााचे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा 2006 अंतर्गत परवाना रद्द करणे यासाठी कार्यवाहीची शिफारस जिल्हाधिकारी तथा फुले योजनेचे जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली होती मात्र तक्रारी व कारवाईच्या कचाट्यातून सुटका होण्यासाठी रक्कम परत केली.
जे रुग्ण तक्रार करतील त्यात चौकशी अंती रक्कम देय निघाली तरच ती रक्कम देऊन मोकळे व्हायचा, आधी लुटायचे नंतर पैसे परत द्यायचे असाच काहीसा प्रकार व फंडा वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे त्यामुळे या नियमात बदल होणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर यांची कमतरता याचा व संघटनात्मक दबाव टाकून अनेक ठिकाणी मनमानी कारभार सुरु आहे. अनेक कालबाह्य नियम व इतर गोष्टींच्या अमूलाग्र बदलांची अपेक्षा आहे.