डॉ वडगावकरांच्या सेवा वृत्तीला सलाम – कुटुंबातील काका काकूंची निधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णसेवेत
उस्मानाबाद – समय सारथी
घरातील दोन जेष्ठ व्यक्तींचे एकाच दिवशी झालेल्या निधनाचे दुःख पचवून व ते बाजूला सारत डॉक्टर विशाल वडगांवकर दुसऱ्या दिवशी आपल्या रुग्णसेवेच्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. कोरोना उपचारावरील तज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ विशाल वडगांवकर यांच्या या रुग्ण सेवाभावी वृत्तीला उस्मानाबादकरांचा सलाम.
कोरोनाचे उपचार सुरू असताना, आपल्या डोळ्यादेखत सख्खे काका आणि काकीचे एकाच दिवशी म्हणजे फक्त पाच मिनिटांच्या अंतराने निधन झाले. डॉ विशाल वडगावकर यांच्या कुटूंबातील पती-पत्नीचे असे एकाचवेळी निधन झाल्याने दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला. बालपणी ज्यांनी अंगाखांद्यावर खेळून लहानाचा मोठा केला ते सख्खे काका आणि काकू मृत्यूंशी झुंज देत एकाच दिवशी देवाघरी गेले ही खूपच हृदयद्रावक दुर्घटना ठरली आहे..
विशेष म्हणजे डॉ विशाल वडगांवकर हे फुफूसरोग तज्ञ आहेत. त्यामुळे कोविड आजारावरील उपचारासाठी परिसरात ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्वाभाविकपणे स्वतःच काका आणि काकूवर उस्मानाबादच्या निरामय-डंबल हॉस्पिटलमध्ये 15 दिवस उपचार केले. त्यांचे सहकारी डॉ.सुश्रुत डंबळ, हॉस्पिटलचा स्टाफ यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण जून्या सह व्याधी, वय आणि अचानक झालेल्या शारीरिक गुंतागुंतीमूळे, डॉ विशाल वडगावकर यांच्या काका आणि काकूने हॉस्पिटलमध्येच प्राण सोडले.
एकाच दिवशी घरातील दोघांच्या झालेल्या या मृत्यूमूळे उस्मानाबादच्या वडगांवकर कुटुंबावर झालेला हा आघात खुपच धक्कादायक होता. शहरात छोटे मोठे व्यवसाय करणारं पाच भावांचे हे संवेदनशील वडगांवकर कुटूंब, दुःखाने पार कोलमडून पडले. पत्नीच्या निधनानंतर पतीने ही लगेचच प्राण सोडण्याच्या या घटनेमुळे शहरात ही हळहळ व्यक्त झाली.
रमेश, उमेश, वसंत ,शरद आणि महेश असे पाच भावंडांचे वडगावकर कुटूंब आहे. डॉ विशाल हे रमेश वडगावकर यांचे थोरले चिरंजीव. अतिशय संघर्ष करत त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवले आहे. याच सामाजिक जाणिवेतून, कोरोनाच्या या तीव्र संकटाच्या काळात, डॉ विशाल हे मागील एक वर्षांपासून, डॉ डंबळ यांच्या निरामय हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तावर अहोरात्र उपचार करत आहेत.या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी हजारो कोरोनाग्रस्ताना जीवदान मिळवून दिले आहे.
विनाकारण, गरज नसताना पेशंटला ऍडमिट करून न घेता, घरीच होम क्वारंटाईन करून उपचार घ्यायला भाग पाडणारा डॉक्टर म्हणून ते आता सामान्य लोकांत जास्त ओळखले जातात. HRCT चा स्कोअर सिव्हीयर असतानाही अनेक पेशंटला घरीच उपचार देऊन त्यांनी कोरोनामुक्त केलं आहे परंतु त्याच कोरोनाने, डॉक्टरांच्याच घरातील, त्यांचे उमेश काका आणि ज्योती काकू यांना त्यांच्यातून हिरावून नेले. नियतीचा हा क्रूर आघात सहन करून, अतिशय दुःखद अंतकरणाने दि.29/04/2021 रोजी दोघांवर ही पहाटे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण, अत्यंत संवेदनशील, आणि माणुसकीचा उर भरून येणारी बाब म्हणजे, स्वतःवर, कुटूंबावर आलेलं दुःख तातडीने बाजूला ठेवून, अंत्यविधीच्या चितांचा विस्तव विजण्याच्या आत, डॉ विशाल वडगांवकर सरांनी आपले रुग्णसेवेचे कर्तव्य सुरू केले.
आपल्याकडे घरातील व्यक्तीच्या निधनानंतर किमान 3 दिवस तरी घरातून कोणी बाहेर पडत नाहीत. शोकमग्न वातावरणातच सर्व कुटूंब बुडालेलं असतं पण मनावर दगड ठेवून डॉ विशाल यांनी लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना मूळे त्रासलेल्या रुग्णांची तपासणी सुरु केली. हा प्रसंग पाहून निरामय हॉस्पिटलचे सहकारी डॉक्टर , कर्मचारी ही आश्चर्यचकित झाले.
स्वतःला दुःखातून सावरण्यासाठी पुरेसा वेळ ही न देता डॉ. वडगांवकर यांनी सामाजिक जाणिवेतून आपले रुग्ण तपासणीचे कर्तव्य प्रथम पार पाडले.
कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता, दररोज वाढणारी रुग्ण संख्या पाहता परिसरातील पेशंटला कांही अडचण होऊ नये म्हणून स्वतःच्या दुःखाला बाजूला करत, रुग्णांच्या त्रासाची, दुःखाची, पर्वा करणा-या डॉक्टरांच्या या सेवावृत्तीला उस्मानाबादकरांचा सलाम.
स्वतःचं दुःख बाजूला ठेवून रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देवदूत का म्हंटल जातं,याचं आदर्श उदाहरण ठरलेले डॉ विशाल वडगांवकर सरांना मनाचा मुजरा तसेच डॉ विशाल वडगावकर यांच्या संपूर्ण कुटूंबाला हे भलं मोठं दुःख सहन करण्याची शक्ती लाभो हिच प्रार्थना
( महेश पोतदार – वरिष्ठ पत्रकार यांच्या लेखणीतून )