डॉक्टरांचा उपचारात निष्काळजीपणा, अहवाल सादर – कारवाईकडे लक्ष
ढोकी येथील कावळे अपघाती मृत्यू प्रकरण – सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा
धाराशिव – समय सारथी
ढोकी येथे झालेल्या अपघातातील जखमी प्रकाश कावळे यांच्या उपचारात निष्काळजी झाल्याचे स्पष्ट झाले असुन याबाबतचा अहवाल तालुका आरोग्य अधिकारी डॉ सी के ऐवळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिला आहे.
ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ एस ए इंगळे व डॉ प्रणिती एच कोनेरी हे दोन डॉक्टर विनापरवाना गैरहजर असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी ढोकी येथे जाऊन केलेल्या प्रत्यक्ष चौकशीत समोर आले. दोन्ही डॉक्टरांनी मुख्यालयी वास्तव्य करुन अपघातग्रस्त रुग्णास रुग्णसेवा देणे बंधनकारक असताना अपघातग्रस्त रुग्णाची तपासणी व उपचार केला नसल्याचे दिसून येते.
आरोग्य सेविका काकडे व परिचर अडसूळ या दोघींनी रुग्णास प्राथमिक उपचार करुन 102 अंतर्गत रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली मात्र रुग्णाची रुग्ण नोंदवहीमध्ये नोंद केल्याचे दिसून येत नाही.वैद्यकीय अधिकारी सुद्धा जबाबदार असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्याने आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
आम आदमी पार्टीने याची तक्रार दिली होती. चौकशी अहवालामध्ये निष्पन्न डॉक्टरवर निलंबनाच्या कारवाईसह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य संघटक ऍड अजित खोत यांनी दिली. प्रकाश कावळे यांचा अपघात झाल्यावर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचा 6 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता.
डॉ कोनेरी ह्या आरोग्य केंद्रात अनेकदा नसतात शिवाय त्या उद्धटपणे वागत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत मात्र कारवाई होत नाही त्यामुळे त्यांचा पाठीराखा कोण याची चर्चा सुरु झाली आहे.