डिमोशन – तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे गट अ संवर्गातून ब वर्गात
विविध गुन्हे, कोठडी, जेल, चौकशी, अपहार – बडतर्फीची आमदार सुरेश धस यांची मागणी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांना पदावनत (डिमोशन) करण्यात आले असुन त्यांना मुख्याधिकारी गट अ संवर्गातून मुख्याधिकारी गट ब संवर्गात पदावनत करण्यात आले आहे. विधी व न्याय विभागाच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली असुन विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी याबाबत लेखी तक्रार केली होती. नगर विकास विभागाचे अवर सचिव अ का लक्कस यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
शासकीय निधीचा अपहार प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता शिवाय त्यांच्यावर अनेक चौकशी, प्रशासकीय कारवाई सुरु असल्याने त्यांचे डिमोशन करण्यात आले आहे. निलंबित यलगट्टे हे एकीकडे पोस्टिंगसाठी हालचाली व प्रयत्न करीत असताना हे डिमोशन त्यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे. यलगट्टे हे सध्या निलंबित असुन विविध गुन्हे प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत.
यलगट्टे यांना 18 जानेवारी 2021 च्या आदेशाने मुख्याधिकारी गट ब संवर्गातून गट अ संवर्गात पदोन्नती (प्रमोशन) देण्यात आली होती. शासकीय निधी अपहार प्रकरणात ते पोलिस कोठडीत असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा नियमाने मानीव निलंबन करण्यात आले होते त्यानंतर त्यांना प्रमोशन दिले गेले. विशेष म्हणजे यलगट्टे यांना धाराशिव नगर परिषदेत असतानाच संवर्ग प्रमोशन मिळाले व धाराशिव येथेच त्याचे डिमोशन झाले हाही योगायोग आहे.
धाराशिव नगर परिषदेतील भंगारचोरी, बोगस बांधकाम परवाना, अट्रॉसिटी, चेक बाउंस या प्रकरणात यलगट्टे यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता त्यावेळी ते फरार होते त्यानंतर धाराशिव पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफिने एसटी बस मधुन प्रवास करताना नाशिक जिल्ह्यात पकडले होते.
यलगट्टे यांच्यावर बायोमायनिंग व चेक खाते बाबत विधिमंडळात खोटी माहिती देणे अश्या 2 वेगवेगळ्या प्रकरणात हक्कभंग दाखल झाला आहे तर नियमबाह्य बोगस नौकरभरती, गुंठेवारी, संचिका गहाळ, निधी वर्ग, स्पेशल ऑडिट यासह बायोमायनींग घोटाळ्यात कारवाईची टांगती तलवार आहे. यात चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे दाखल झाला असुन कार्यवाही अंतीम टप्प्यात आहे.
शासनाला प्रमोशन देताना खोटी माहिती देण्यात आली तसेच लाभ घेतल्याने या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना देण्यात आलेले वेतन, भत्ते याची वसुली नियमानुसार करावे अशी आमदार धस यांनी पत्राद्वारे केली आहे. यलगट्टे हे अनेक घोटाळ्यात अडकले आहेत. लाचलुचपत विभागाकडे त्यांच्या संपत्तीची चौकशी सुरु आहे.
नांदेड जिल्ह्यातील भोकर, माजलगाव, धाराशिव अश्या ठिकाणी जवळपास 6 ते 7 गुन्हे नोंद असुन त्यांना आजवर 2 वेळेस 3 दिवसापेक्षा अधिकची पोलिस कोठडी झाली आहे तर धाराशिव येथे गुन्ह्यात ते तब्बल 21 दिवस पोलिस कोठडी व जेलमध्ये होते तरी त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशीही मागणी आमदार धस यांनी केली आहे.