रंगा-बिल्ला जोडीच्या उपमासह वाद थेट तालिबान,महाभारत व रामायणापर्यंत
उस्मानाबाद – समय सारथी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्याचे पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणात उमटत असुन ट्विटर वॉर पेटले आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी ट्विट केल्यानंतर त्याला शिवसेनेच्या खासदार व आमदारांनी प्रतिउत्तर दिले आहे.त्यानंतर कार्यकर्तेमध्ये जोरदार टीकाबाजी होत आहे. राणे प्रकरणाने उस्मानाबादचे राजकीय वातावरण पेटले असून तालिबान, रामायण , महाभारताच्या दाखल्यासह रंगा-बिल्ला ,रावण,राम- लक्ष्मण जोडी अशी उपमा देत शिवराळ भाषेत आरोप सोशल मीडियावर केले आहेत.या ट्विटर वॉर नंतर आगामी काळात उस्मानाबाद जिल्ह्यात भाजप – शिवसेना आमने सामने येणार असल्याचे दिसते.
भाजप आमदार राणा पाटील यांचे ट्विट
जगाला तालिबान पासून आणि महाराष्ट्राला धनुष्यबाण पासून खरा धोका आहे असे ट्विट भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांनी राणे यांच्या अटकेचा निषेध ट्विट करून केला आहे त्या ट्विटला शिवसेनेने उत्तर दिले आहे.
खासदार ओमराजे व आमदार यांचे ट्विट
धनुष्यबाण हे अर्जुनाचे अस्त्र आहे त्यापासुन फक्त कौरवांना धोका , राज्यात तर 105 कौरव आहेत त्याला फक्त धनुष्यबाणच रोखणार असे ट्विट शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर,जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे. भाजप आमदार यांना कैलास पाटील यांनी कौरवांची उपमा दिली असून त्याला शिवसेनेचा धनुष्यबाणच रोखणार असे सांगत हल्लाबोल केला आहे.
शिवसैनिकांचा राणा पाटीलावर हल्लाबोल
शिवसैनिकांनी भाजप आमदार पाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा धनुष्यबाण असलेला गमजा व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर झालेल्या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत. धनुष्यबाणापासून धोका होता म्हणणारे निवडणुकीत धनुष्यबाण घालून मतांची भीक मागत होते अन मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश द्यावा म्हणून 4 वेळा लोटांगण घेत होते. काय वेळ आली तुमच्यावर पार सतरंज्या उचलाव्या लागत आहेत फडणवीसांच्यासह तिकिटासाठी मातोश्रीवर जाणाऱ्यानी धनुष्यबाणवर बोलू नये अशी टीका शिवसैनिकांनी भाजप आमदार पाटील यांच्यावर केली आहे.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह यांचे ट्विट
धाराशिवचे रंगा-बिल्ला जोडी विकास काम करतानाचा आव आणून नळी खाऊ की पोळी खाऊ असा झाले आहे.मोदी लाटेत ओमराजे खासदार व कैलास पाटील हे आमदार झालेल्यांनी कौरव पांडवांचे उदाहरण देऊ नये.भगवान श्रीरामाने देखील स्वयंवराच्यावेळी अहंकाररुपी धनुष्य तोडून सत्याचा विजय मिळवला होता असे ट्विट भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी करून खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांना रंगा-बिल्ला जोडीची उपमा दिली आहे.
राम लक्ष्मण जोडी – रावणरुपी विरोध
ओम दादा ,कैलास दादा ही जोडी अशी तशी नाही ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. याच जोडीनं धनुष्यबाणाच्या जोरावर जिल्ह्याचा विकास कामाचा रथ ओढला आहे. पण रावणरुपी विरोधकांचा अडथळा आहेच असल्या प्रवृत्तीचा विनाश करण्याचा अनुभव राम लक्ष्मणाला आहे अशी पोस्ट शिवसेनेचे नगर परिषद गटनेते सोमनाथ गुरव यांनी केली आहे
निष्क्रिय लोकांनी इतरांवर टीका करू नये,कामं केली असती तर मतदार संघातून पळ काढायची वेळ आली नसती.आजपर्यंतचे राजकारण पवार साहेबांच्या जीवावर केले, पडत्या काळात त्यांनासुद्धा धोका देऊन लालच व स्वार्थासाठी आमदारकी साठी मातोश्रीचे उंबरठे झिजवून तेथे मेळ नाही लागल्यावर मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी पक्ष सोडला. आणि पवार साहेबांच्या भाषेत सांगायचे झाले यर मागील 40 वर्षात काय….. सगळ्यांना माहिती आहे.बाकी पोस्ट टाकणाऱ्याने एखादी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका निवडणूक तरी लढवून दाखवावी, नंतर लोकांची मापे काढावीत.अशी टीका युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते यांनी केली आहे