जेलमध्ये रवानगी – भवानी चौक हत्याकांड प्रकरणात धाराशिव कोर्टाचा आदेश
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील भवानी चौक येथे भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी सर्वच्या सर्व 5 आरोपीना अटक केली आहे यापूर्वी एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज उर्वरित 4 आरोपीना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सर्व 5 आरोपीच्या वतीने ऍड अमोल वरुडकर यांनी बाजू मांडली. पोलिसांनी या 4 आरोपीची पुन्हा 7 दिवसांची कोठडी मागितली होती मात्र युक्तीवादनंतर न्यायालयीन कोठडी देत जेलमध्ये रवानगी करण्यात आली.
सांजा येथील अक्षय पडवळ, सागर पडवळ, रणजित सूर्यवंशी, नारायण डोंगरे व काका सूर्यवंशी या पाच जणांनी रामेश्वर मोहिते या तरुणाचा जमिनीच्या वादातून हात पाय तोडून खुन केला होता. यातील नारायण डोंगरे याला पोलिसांनी 27 एप्रिल रोजी अटक केली होती त्यानंतर उर्वरित 4 जणांना अटक केली.
हाताचे व पायाचे तुकडे होईपर्यंत हत्याराने वार करीत खुन करण्यात आला. अत्यंत नियोजनबद्ध रित्या या हत्याकांडाचा कट रचला गेला. कलम 302 सह अन्य कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धाराशिव शहरातील हत्याकांडात स्वतः पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी लक्ष घातले असुन आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचारी याची टीम तपास करीत आहे.