जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुक – 15 जागांसाठी 164 उमेदवारी अर्ज
भुम तालुक्यातुन मधुकर मोटे बिनविरोध – अनेक दिग्गजांची उमेदवारी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 15 संचालकांच्या जागांसाठी 164 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दिली. भुम विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघातून मधुकर मोटे यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध असल्याचे मानले जात असून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. 18 जानेवारी ते 24 जानेवारी या सात दिवसांच्या काळात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यात अनेक दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले.
विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्था मतदार संघात 8 संचालक असून यासाठी उस्मानाबाद गटात 13 अर्ज , तुळजापूर व उमरगा तालुका प्रत्येकी 6, कळंब 8, भुम 2, परांडा 8, लोहारा 6 व वाशी तालुका असे अर्ज दाखल झाले आहेत तर 2 जागा या महिला प्रतिनिधी साठी राखीव असून त्यासाठी 39 अर्ज दाखल झाले आहेत, अनुसूचित जाती व जमाती 1 जागेसाठी 12 अर्ज , इतर मागास प्रवर्ग 1 जागेसाठी 15 अर्ज, भटक्या विमुक्त जाती व मागास प्रवर्ग 1 जागेसाठी 16 अर्ज तर इतर शेती संस्था 1 व नागरी बँका आणी इतर संस्था गटातून 1 जागेसाठी या दोन्ही गटात प्रत्येकी 13 अर्ज दाखल झाले आहेत. यात अनेक जणांनी 2 ते 4 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
25 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे तर 27 जानेवारी रोजी दाखल उमेदवार यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 27 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 20 फेब्रुवारीला मतदान तर 21 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
11 फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप व उमेदवार यांची अंतिम यादी प्रसिद्ध करता येणार आहे तर 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत विविध मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे तर 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्राची यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.