जिल्हा पाण्यात बुडालेला असताना इंगोलेची कर्मचाऱ्यासोबत मद्यपान पार्टी परंडा मुख्याधिकारी मद्यधुंद प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सुनावणी
उस्मानाबाद – समय सारथी
संपूर्ण जिल्हा कोरोनाने त्रस्त व अतिवृष्टीच्या संकटाने पाण्यात बुडालेला असताना परंडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक इंगोले हे मात्र दिवसाढवळ्या दारूच्या पार्टीत मग्न असल्याचा प्रकार गेल्या महिन्यात घडला होता. नशेमध्ये बेधुंद अवस्थेत आढळल्याचा हा प्रकार नयी रोशनी सोशल ग्रुपचे संस्थापक तथा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ॲड. नुरोद्दीन चौधरी यांनी चव्हाट्यावर आणला होता. याप्रकरणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या समोर मंगळवारी (दि.३) नप मुख्याधिकारी यांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीला मुख्याधिकारी,तक्रारदार व पोलीस निरीक्षक यांच्या म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे त्यामुळे या सुनावणीसह कारवाईकडेच नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. काही भागात तर अतिवृष्टी झाल्याने हाहाकार माजला होता. शेतीसह पिके व घरांचेही नुकसान झाले होते. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी वारंवार अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश जारी केले होते तसेच आपत्तकालीन स्थितीत उपायोजना राबविण्याचे निर्देश जारी केले होते. दरम्यान,सीना कोळेगाव प्रकल्प धोक्याची पातळी ओलांडत होता तर परंडा येथेही मुसळधार पावसामुळे अनेक घरासह व्यापारी संकुलातही पाणी शिरले होते. दरम्यान, परंडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक इंगोले हे भरदिवसा आणि तेही शासकीय खोलीतच दारूचे पेग रिचवत असल्याचा प्रकार १४ ऑक्टोबर रोजी चव्हाट्यावर आला होता. नयी रोशनी सोशल ग्रुपचे संस्थापक तथा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ॲड.नुरोद्दीन चौधरी यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी यांना गुरुवारी (दि.१५) तक्रारी निवेदन दिले होते. यात म्हटले की, परंडा शहरात बुधवारी (दि.१४) मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. ॲड. चौधरी यांच्या घरातही पाणी साठले होते. त्यामुळे त्यांनी मुख्याधिकारी यांना फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही. त्यानंतर मुख्यधिकारी नगर परिषदेच्या फिल्टरवरच्या खोलीत असल्याची माहिती मिळाल्याने ॲड. चौधरी फिल्टरकडे गेलेे. तेथे मुख्याधिकारी इंगोले हे कर्मचारी सातारकर यांच्यासोबत मद्यपान करीत बसले होते. मुख्याधिकारी नशेत धुंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर ॲड. चौधरी परंडा पोलीस ठाणे येथे गेले असता पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठांना सांगा असे सांगितले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, परंडा तहसीलदार यांना हा प्रकार सांगितला असता त्यांनी पोलीस स्टेशनला कळवितो असे सांगितले. त्यानंतर ॲड. चौधरी पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. पोलीस निरीक्षकांनी पोलीस पथक नगर पालिकेच्या फिल्टरवर पाठविले; परंतु तेथुन मुख्यधिकारी हे गायब झाले होते. त्यांचे हे कृत्य बेजबाबदारपणाचे असून, शासकीय जागेचा वापर धुम्रपान करण्यासाठी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन निलंबीत करावे, अशी मागणीही ॲड. चौधरी यांनी केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी परंडा पोलीस, मुख्याधिकारी व तक्रारदार यांना नोटीस काढून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी मंगळवारी(दि.२) सुनावणीही ठेवण्यात आली आहे.त्यामुळे या सुनावणीत नप मुख्याधिकारी इंगोले काय भूमिका मांडणार व जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार ? याकडेच लक्ष वेधले आहे.