जावई बापू राजेश टोपे .. उस्मानाबादकडे लक्ष देऊन एकदा बैठक घ्या
तज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित मनुष्यबळ अपुरे – मराठवाड्यात उस्मानाबादचा मृत्यूदर सर्वाधिक
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी उपस्थित केले अनेक मुद्दे
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोविड बाधित रुग्णांचा दुर्दैवी व उच्चांकी मृत्यू दर लक्षात घेता तातडीने, जाणीवपूर्वक व नियोजनबद्ध उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्ह्यात बैठक घेण्याची मागणी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांची आढावा बैठक घेतली होती. आज १० मे, २०२१ रोजी कोरोनाने जिल्ह्यात भयावह रूप धारण केले असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासह आरोग्य यंत्रणेस नियोजनबद्ध उपाययोजना आखून देणे गरजेचे आहे.
शासकीय आकडेवारीनुसार उस्मानाबाद जिल्ह्यात आजमितीला एकूण बाधित रुग्णसंख्या ४५,४३१ झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ७,२७७ आहे. कालपर्यंत जिल्ह्यात १,०७७ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जिल्हा रुग्णालयातून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे जिल्हाभरात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४३,३४७ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ४४,६९८ म्हणजे ३४.४८% नमुने पॉजिटिव्ह आले आहेत. काल प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर चाचणीच्या ६२१ ग्राह्य अहवालामधील ३११ नमुने म्हणजे ५०% पॉजिटिव्ह आले तर रॅपिड अॅटीजेन टेस्ट अंतर्गत १,५२६ पैकी ४०१ नमुने म्हणजे २६ % पॉजिटिव्ह आले, असे काल एका दिवसात ७१२ नवीन रुग्ण सापडले आहेत.
१६ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात दिवसाला केवळ २ ते ३ हजार चाचण्या केल्या जात असल्यामुळे संक्रमित झालेले नागरिक वेळेत सापडणे शक्य होत नाही त्यामुळे इतरांना संक्रमणाचा धोका वाढत आहे व वरचे वर रुग्ण संखेत वाढ होण्याची शक्यता आहे. अत्यावस्थ झालेल्या रुग्णांचा प्राधान्याने उपचार हा जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथे केला जातो. जिल्ह्यात इतर मोठे खाजगी रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने हा भार जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडतो. निकषानुसार व प्रत्यक्षात काम करतांना लागणारे तज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम होत आहे.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा विचार केला तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त २.४०% मृत्युदर आहे व प्रति लाख लोकसंख्येमागे ६५ मृत्यू हा ही दुर्दैवी उच्चांकी आकडा आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या बरोबर गेल्या आठवड्यात सविस्तर चर्चा करून विषयाचे गांभीर्य सांगत उस्मानाबाद जिल्ह्यात तातडीने, जाणीवपूर्वक व नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली होती. राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री व मराठवाड्याचे सुपुत्र आणि उस्मानाबादचे जावई म्हणून आपण देखील हा विषय अतिशय गांभीर्याने घ्याल ही अपेक्षा आहे तरी या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून उस्मानाबाद जिल्ह्यातील कोविड-१९ बाधित रुग्णांचा दुर्दैवी व उच्चांकी मृत्यू दर लक्षात घेता तातडीने, जाणीवपूर्वक व नियोजनबद्ध उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्ह्यात बैठक घ्यावी, ही उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आग्रहाची विनंती आमदार पाटील यांनी आरोग्य मंत्री टोपे यांना केली आहे.