जामीन मंजुर – तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी यलगट्टे यांना मोठा दिलासा – बोर्डे व पवार अद्याप फरार
27 कोटींच्या गुन्ह्यात त्रिकुट अडकले, पुन्हा अटकेच्या कारवाईची टांगती तलवार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील फसवणूक व अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंजुर केला असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी 1 ऑगस्ट रोजी त्यांना अटक केली होती त्यानंतर ते तब्बल 42 दिवस धाराशिव जिल्हा कारागृहात होते मात्र त्याच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एस जी चपलगावकर यांनी जामीन मंजुर केला आहे. 50 हजार रुपये जाचमुचलका व दर शनिवारी 10 ते 2 दरम्यान पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यासह इतर अटीवर जामीन मंजुर केला आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेसाठी आलेला 3 कोटी 14 लाख रुपयांचा निधी रमाई आवास योजनेच्या खात्यात जमा करुन त्यातील 21 लाख 64 हजार रकमेचा अपहार व फसवणूक केल्या प्रकरणी यलगट्टे यांच्यासह लेखापाल सुरज बोर्डे, अंतर्गत लेखानिरीक्षक प्रशांत पवार यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने कलम 409, 420, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात यलगट्टे यांना पोलिसांनी पुणे येथील त्यांच्या घरून अटक केली होती तर इतर आरोपी फरार आहेत.
27 कोटींच्या गुन्ह्यात त्रिकुट अडकले
ठेकेदार, विकास योजना व इतर खर्चाची 27 कोटी 34 लाख रुपयांची 514 प्रमाणके म्हणजे व्हाऊचर गायब प्रकरणात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह तत्कालीन लेखापाल सुरज बोर्डे व अंतर्गत लेखापरीक्षक प्रशांत पवार या 3 जणांवर विविध कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या तक्रारीनंतर या महाघोटाळ्याची पोलखोल झाली आहे.या गुन्ह्याची व्याप्ती वाढणार असून अनेक ठेकेदार यांना लाखो रुपयांची बिले देण्यात आल्याने ते रडारवर आहेत.