देवानंद रोचकरी बंधुचा जामीन उस्मानाबाद जिल्हा कोर्टाने फेटाळला
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप केल्याप्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांचा जामीन अर्ज उस्मानाबाद जिल्हा कोर्टाने फेटाळला आहे. न्यायाधीश एन एच मखरे यांनी याबाबत आदेश करीत असताना जामीन फेटाळला. प्राचीन मंकावती तिर्थकुंडाची देवानंद रोचकरी यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेली नोंद , जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल, रोचकरी यांच्यावर दाखल असलेल्या 35 गुन्ह्यांचा इतिहास व गुन्हेगारी पार्श्वभूमी, शासकीय व खासगी जमीन बळकावणे,तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे मारहाण प्रकरणात झालेली शिक्षा यासह अन्य बाबींवर न्यायालयाने मत नोंदवित जामीन 9 सप्टेंबर 2021 रोजी फेटाळला आहे. याप्रकरणी सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ऍड शरद जाधवर यांनी तर आरोपींच्या वतीने ऍड विजयकुमार शिंदे यांनी न्यायालयात बाजु मांडली. जामीन फेटाळल्याने रोचकरी बंधुचा उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील मुक्काम तूर्तास तरी वाढला असुन हे प्रकरण आता औरंगाबाद उच्च न्यायालयात जाणार आहे.
मंकावती तिर्थकुंड प्रकरणात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला रोचकरी यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्थगिती आदेश मिळविल्यानंतर रोचकरी समर्थकांनी सोशल मीडियावर केलेला आनंदोत्सव,धमक्या, शिवीगाळ यासह इतर बाबी न्यायालयाने निकालात नमुद करीत जामीन फेटाळला आहे
उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात 6 सप्टेंबर रोजी रोचकरी बंधूंच्या जामीनावर फैसला होणार होता मात्र तो 7 नंतर 8 सप्टेंबर असे पुढे ढकलत 15 तारीख दिली होती मात्र त्यापूर्वीच निकाल दिला.देवानंद रोचकरी बंधूंना 18 ऑगस्ट अटक झाल्यावर त्यांना कोर्टाने 24 ऑगस्टपर्यंत 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्यानंतर ते 24 ऑगस्टपासुन उस्मानाबाद जेलमध्ये आहेत.
डोईफोडे आत्महत्या प्रकरणात पोलीस अधीक्षकांचे विशेष लक्ष व तपासाच्या सुचना –
तुळजापूर येथील तत्कालीन तालुका भुमी अधिक्षक पंडीत डोईफोडे यांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात खुद्द पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी लक्ष घातले असुन या आत्महत्या प्रकरणाची पडद्यामागील कारणे व अज्ञात आरोपी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रौशन यांनी डोईफोडे आत्महत्या प्रकरणाच्या गुन्ह्याची फाईल व त्याची तपासाची स्तिथी संचिका मागवुन घेतली आहे त्यावर तपास सुरू आहे त्याबाबत पोलीस अधीक्षक रौशन यांनी विशेष सूचना दिल्या आहेत.
काय आहे मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण –
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे. रोचकरी यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे 307 कलम अंतर्गत तब्बल 6 गुन्हे यापूर्वी नोंद आहेत तर 3 गुन्हे शासकीय कर्मचारी यांना मारहाण व कामात अडथळा आणल्याचे आहेत त्यासह फसवणूक,मुंबई जुगार कायदानुसार गुन्हे नोंद आहेत. रोचकरी यांच्यावर मंकावती प्रकरणात तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420,467,468,469,471 सह 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. सावकारकी , शासकीय ,खासगी जमीन हडप करणे व त्यावर कोर्टाचे आदेश जुगारून अतिक्रमण करणे असे तब्बल 35 गुन्हे पूर्वी नोंद आहेत असा अहवाल पोलिसांनी कोर्टात दिला होता.
सातवी पिढीची मालमत्ता मग वारस एकच कसा ?
मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांचे आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीची व वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे केला होता. मंकावतीराव रोचकरी यांचे नावाने मंकावती कुंड आहे तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी अशी मागणी केली होती. मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचे हे कुंड असून हि वडिलोपार्जित मालमत्ता पुरातन काळातील असून माझी सातवी पिढी ची या कुंडावर मालकी हक्कात नोंद असून कब्जेदार आहे असे म्हणटले होते.शेटीबा मंकावतीराव यांच्या नंतर अनेक वारस असताना अन्य वारसांना त्यांच्या हक्कापासून वगळून थेट देवानंद रोचकरी यांचे नाव लावण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप ऍड जनक कदम – पाटील यांनी केला.