धाराशिव
जागर फाउंडेशन धाराशिवतर्फे मागील 14 वर्षांपासून सलगपणे राबवण्यात येणाऱ्या शालेय साहित्य वाटप उपक्रमांतर्गत यावर्षीही 100 पेक्षा अधिक होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात केवळ शालेय साहित्यच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात धाराशिवचे नाव राज्य व देशपातळीवर उजळवणाऱ्या 51 गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शालेय राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विविध माध्यमांचे पत्रकार मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. यामध्ये राजाभाऊ वैद्य (दैनिक भास्कर), देविदास वेदपाठक (आकाशवाणी व दूरदर्शन), संतोष जाधव (दैनिक समय सारथी), काकासाहेब कांबळे (लोकशाही न्यूज चॅनल), वाघमारे सर (दैनिक लोकमत), विशाल जगदाळे, किशोर माळी, संस्थेचे सचिव शितल देशमुख, प्रतिनिधी मुकुंद घाडगे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य रितीने करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी जागर फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
“समाजातील शिक्षण व क्रीडाक्षेत्रातील उपेक्षित, होतकरू मुलांना प्रोत्साहन देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या मुलांतच उद्याचे डॉक्टर, खेळाडू, अधिकारी, शास्त्रज्ञ लपले आहेत. त्यांना योग्य वेळी मदतीचा हात दिल्यास ते भविष्यात समाजाचे उज्वल भविष्य घडवतील.” असे मनोगत सचिव शितल देशमुख यांनी व्यक्त केले.शालेय साहित्य मिळाल्याने आमच्यावरचा ताण कमी झाला आहे. आम्हालाही आता आत्मविश्वासाने अभ्यास करता येईल. यासाठी जागर फाउंडेशनचे विद्यार्थी व पालकांनी मनापासून आभार मानले.
जागर संस्था ही वर्षभर विद्यार्थी यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवित असते त्यात मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर, पर्यावरण पुरक गणेश मुर्ती बनविणे, क्रीडा मार्गदर्शन शिबीर, हस्ताक्षर संगणक प्रशिक्षण शिबीर,,वृक्ष लागवड व संवर्धन, विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांचे व मुलींचे ढोल, लेझीम पथक, अनाथ मुलांना दिवाळी भेट, फटाके प्रदूषणमुक्त दिवाळी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत जाधव व सचिव शितल देशमुख यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतुन विविध उपक्रम राबविले जात आहेत.