जलजीवन योजनेच्या 253 कोटींच्या 667 कामांना स्थगिती – आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारीनंतर पालकमंत्री सावंत यांचे आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन योजनामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यव्हार व पदाचा दुरुपयोग करुन ई निविदा प्रक्रिया राबविली गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी लेखी पत्र देत ही सर्व प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या तक्रारी यांच्या अनुषंगाने सर्व संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे तरी या योजने अंतर्गत पुढील आदेशापर्यंत कोणत्याही प्रकरची ई निविदा प्रक्रियेवर कार्यवाही करण्यात येऊ नये असे पालकमंत्री यांनी आदेशीत केले आहे त्यानंतर ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेच्या कामातील निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी याबाबतचे आदेश दिले आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 702 योजना मंजुर असून यातील 692 कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे तर 686 कामांना प्रशासकीय मान्यता देऊन 667 कामांची ई निविदा काढण्यात आली होती. 253 कोटी रुपयांच्या या सर्व कामांना स्थगिती दिली आहे. यातील 179 कामे ही ग्रामपंचायत स्तरावर तर उर्वरित कामे ही जिल्हा परिषद स्तरावरील आहेत.
अधिकारी व कर्मचारी यांची विभागीय चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके, जिल्हा परिषद सदस्य उद्धव साळवी, उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय मोहिते, भुम तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट, तालुका संघटक शिवहार स्वामी, विकास तळेकर, प्रवीण गायकवाड, परंडा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ अनुजा दैन, उपसभापती पोपट चोबे, राजुरीचे सरपंच शीतल गोरे, साकतचे सरपंच विठ्ठल ढगे यांनी पालकमंत्री डॉ सावंत यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली होती.