जयलक्ष्मी साखर कारखान्याच्या 80 एकरचा 15 फेब्रुवारीला लिलाव
शेतकर्यांची ऊसबिले थकविली, जिल्हाधिकार्यांची कडक कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
भाजप नेते विजय दंडनाईक यांच्या नितळी जयलक्ष्मी साखर कारखान्याने 2015 मध्ये गाळप झालेल्या ऊसाची जवळपास साडेसात कोटीची बिले न दिल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कारखान्यावर आरआरसीची कारवाई केली आहे. कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्त केली असून या मालमत्तेवर महाराष्ट्र शासनाचा बोजा टाकण्यात आला आहे. सात वर्षे झाली तरी कारखान्याने शेतकर्यांची ऊसाची बिले न दिल्याने स्थावर मालमत्तेचा लिलाव 15 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.
भाजप नेते विजय दंडनाईक यांनी नितळी शिवारात जयलक्ष्मी साखर कारखान्याची उभारणी केलेली आहे. कारखान्याच्या चाचणी हंगामात उस्मानाबाद, लातूर, औसा, तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी गाळपासाठी ऊस दिला होता. परंतु कारखान्याने ऊसाची बिले दिली नाहीत. भाजपाचे नेते पाशा पटेल यांनी ऊस बिलाच्या मागणीसाठी विजय दंडनाईक यांच्या घरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकर्यांचा मोर्चा काढला होता. तरीही अनेक शेतकर्यांना बिले देण्यात आली नाहीत. त्यामुळे साखर आयुक्तांच्या आदेशानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी वसुलीसाठी कारखान्यावर आरआरसीची कारवाई केली.
कारखाना मालकीच्या जवळपास 80 एकर जमिनीवर शासनाचा सात कोटी 69 लाखांचा बोजा चढविण्यात आला होता. तरीही कारखान्याने शेतकर्यांची बिले न दिल्याने आता जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी कारखाना मालकीच्या जप्त केलेल्या जमिनीचा लिलाव काढला आहे. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नितळी येथे जमिनीचा लिलाव होणार आहे. लिलावामध्ये फक्त शेतकर्यांना सहभागी होता येणार आहे. जास्तीत जास्त शेतकर्यांनी लिलावामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.