जमीन घोटाळा – उस्मानाबाद शहरातील 3 हजार 220 एकर क्षेत्रावर वर्ग 2 ची नोंद
उस्मानाबाद शहरातील देवस्थान, वकफ, वतन, सिलिंग जमिनीच्या भोगवटदार वर्गीकरण घोटाळ्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. शहरातील तब्बल 375 विविध सर्वे नंबर मधील 1 हजार 303 हेक्टर म्हणजे 3 हजार 220 एकर क्षेत्रावरील जमिनीच्या नोंदी सात बारा उताऱ्यावर वर्ग 2 मध्ये घेण्यात आल्या आहेत. शहरातील जवळपास 2 हजारहून अधिक खातेदारांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून शर्तभंग केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. देवस्थान, वकफ यांना दिलेल्या खिदमतमाश म्हणजे सेवेसाठी दिलेल्या जमिनी उस्मानाबाद शहरातील अनेक धनदांडग्या व राजकीय नेत्यांनी तत्कालीन महसुली अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःच्या नावे केल्याचे समोर आले आहे. यातील अनेक जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आता वर्ग 2 ची नोंद करण्यात आल्याने त्याची खरेदी विक्री करता येणार नाही. यात अनेक राजकीय नेते, प्रतिष्ठीत यांच्या ताब्यातील जमिनी असून त्यावर टोले जंग इमारती व अकृषी वापर करण्यात आला आहे. खिदमतमाश जमिनीच्या शर्तभंग प्रकरणी संबंधित खरेदी विक्री करणारे व्यक्ती व त्याला मंजुरी देणारे तत्कालीन अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी महसुली रेकॉर्ड तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली असून यात नियमबाह्य असलेली हजारो एकर जमीन वर्ग 1 मधुन वर्ग 2 करण्यात येत आहे.