चौकशी समिती गठीत – तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टेच्या कारभाराच्या चौकशीचे जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांचे आदेश
महानगरोत्थानसह अन्य योजना चौकशीच्या रडारवर – 7 दिवसात अहवाल सादर होणार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्या कारभाराच्या चौकशीचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी लेखी आदेश दिले असुन यासाठी 6 सदस्य असलेली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला 10 एप्रिल पासुन चौकशी सुरु करुन 7 दिवसात चौकशी करुन स्वयंस्पष्ट अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. भंगारचोरीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या निलंबित मुख्याधिकारी यलगट्टे यांच्या समोरील अडचणी यामुळे वाढणार आहेत.
यलगट्टे यांच्या काळात महानगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव शहर मलनिस्सारण प्रकल्प टप्पा क्रमांक 1 व इतर योजनाचे ठेकेदार यांना देण्यात आलेले धनादेश ( चेक ) बँकेमध्ये न वटता परत आले तसेच विविध योजने अंतर्गत नगर परिषदेस प्राप्त झालेले अनुदान हे योजनेत समाविष्ट कामावर खर्च न करता इतर कामावर खर्च करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर वरील मुद्याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे.
धाराशिव नगर परिषदेचे विविध बँकात 39 खाते असल्याची माहिती यलगट्टे यांनी दिली मात्र उमरगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी केलेल्या तपासणीत धाराशिव नगर परिषदेची 121 खाती असल्याचे उघड झाले. यावरून एकच योजनेचे एकपेक्षा जास्त खाती उघडल्याची शक्यता नाकारता येत नाही. यनिमित्ताने नगरोत्थान योजना चौकशीच्या रडारवर आहे.
जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी गोविंद बोंदर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असुन त्यात सदस्य म्हणून उमरगा नगर परिषदेचे लेखापाल अंकुश माने, भूमचे लेखापाल विवेकानंद बिराजदार, कळंबचे हिंदुराव जगताप, लोहाऱ्याचे दीपक मुंडे व वाशीचे भागवत पवार यांचा समावेश आहे. या समितीने चौकशी करुन दोषी असल्यास जबाबदारी निश्चित करुन शिफारशीसह अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.