चिंताजनक – उस्मानाबाद जिल्ह्यात 67 पैकी 14 बालके कोरोना पॉझिटिव्ह
लहान बालकांसाठी संभाव्य तिसरी लाट धोकादायक – डेल्टा व्हायरसची टांगती तलवार
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमालीची कमी झाली असली तरी जे रुग्ण सापडत आहेत त्यात 18 वर्षाखालील बालकांचा समावेश चिंताजनक आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी 67 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्यात 14 बालकांचा म्हणजे जवळपास 21 टक्के रुग्ण हे लहान बालक असून ही बाब चिंताजनक आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.57 टक्के आहे तर आजवर 1 हजार 373 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्युदर हा 2.35 टक्के आहे. आजवर कोरोनाचे 58 हजार 263 रुग्ण सापडले त्यातील 56 हजार 2868 रुग्ण उपचारानंतर बरे झाले.
सोमवारी 28 जुन रोजी 1 हजार 722 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात 3.89 म्हणजे 67 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. 67 पैकी 31 जण हे आरटीपीसीआर चाचणीत तर 36 जण रॅपिड चाचणीत पॉझिटिव्ह सापडले. उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 30 रुग्ण सापडले. लहान बालकांसाठी कोरोनाची येणारी तिसरी संभाव्य लाट ही घातक मानली जात असताना बालकांचे पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. कोरोनाचे नवीन रूपांतर असलेला डेल्टा व्हायरस सुद्धा चिंताजनक असून त्याची टांगती तलवार कायम आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात लहान मुलांसाठी कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले असुन कोरोनाची कोणतीही प्राथमिक लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.