चिंताजनक – उस्मानाबाद जिल्ह्यात 91 रुग्णांपैकी 22 बालके कोरोना पॉझिटिव्ह
रुग्णांचा आकडा वाढतोय , आज 91 रुग्ण तर 2 जणांचा मृत्यू
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सोमवारी 91 नवीन रुग्ण सापडले त्यापैकी 22 रुग्ण हे बालके असून हे प्रमाण 24 टक्केपेक्षा जास्त आहे त्यामुळे आगामी काळात ही बाब चिंतेची ठरणार आहे. 0 ते 18 वर्षाखालील बालकांचा कोरोना रुग्णात समावेश चिंताजनक असुन हे प्रमाण 20 ते 25 टक्के दरम्यान आहे. सोमवारी 42 रुग्ण उपचारनंतर बरे झाले तर 2 जणांचा मृत्यू झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.70 टक्के आहे तर आजवर 1 हजार 376 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्युदर हा 2.34 टक्के आहे. आजवर कोरोनाचे 58 हजार 699 रुग्ण सापडले त्यातील 56 हजार 764 रुग्ण उपचारानंतर बरे झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 559 सक्रीय रुग्ण आहेत.
सोमवारी 5 जुलै रोजी 2 हजार 211 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात 4.11 म्हणजे 91 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. 91 पैकी 31 जण हे आरटीपीसीआर चाचणीत तर 60 जण रॅपिड चाचणीत पॉझिटिव्ह सापडले. कळंब तालुक्यात सर्वाधिक 22 रुग्ण सापडले. लहान बालकांसाठी कोरोनाची येणारी तिसरी संभाव्य लाट ही घातक मानली जात असताना बालकांचे पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. कोरोनाचे नवीन रूपांतर असलेला डेल्टा व्हायरस सुद्धा चिंताजनक असून त्याची टांगती तलवार कायम आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात लहान मुलांसाठी कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले असुन कोरोनाची कोणतीही प्राथमिक लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असुन 50 रुग्ण सापडण्याचा आकडा आता शंभरीकडे जात आहे. 27 जुन रोजी 31 रुग्ण, 28 जुन 67, 29 जुन 53,30 जुन 66, 1 जुलै 52, 2 जुलै 70, 3 जुलै 52 , 4 जुलै 52 व 5 जुलै रोजी 91 रुग्ण सापडले.
बाजारपेठ व इतर दुकाने खुली असल्याने अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरत आहेत त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.