आदिशक्ती कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या तुळजापूर तालुक्यात केवळ 887 मुलींचा जन्मदर
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण ( Sex ratio) प्रमाण कमी झाले असून याकडे प्रशासनाने लक्ष देऊन जनजागृतीची मोहीम राबविने गरजेचे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात स्त्री पुरुष लिंग प्रमाण हे 1 हजार मुलांमागे 917 असे आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आदिमाया तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक कमी 887 असे मुलींचे प्रमाण आहे त्यामुळे मुलगी वाचवा अभियान राबविण्याची गरज आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 4 वर्षांपासून मुलींचे प्रमाण कमी होत असुन यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात 2017-18 या वर्षी मुलींचे प्रमाण 914 , 2018-19 वर्षी 965, 2019-20 या वर्षी 928 तर 2020- 21 यावर्षी 917 असे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सर्वात कमी 887 असे मुलींचे प्रमाण आहे तर त्यापाठोपाठ उस्मानाबाद तालुक्यात 897 असे प्रमाण आहे सर्वाधिक मुलींचे प्रमाण हे लोहारा तालुक्यात 979 असे आहे. भूम तालुक्यात 934, कळंब 950,उमरगा 946,परंडा 907,वाशी तालुका 925 असे प्रमाण आहे. यावर्षी जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात 11 हजार 727 मुले तर 10 हजार 755 मुली जन्माला आल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात प्रशासनाने स्त्री जन्माचे स्वागत,मुलगा मुलगी भेद करू नका, बेटी बचाओ बेटी पाढाओ यासह अन्य उपाययोजना केल्या असल्या तरी मुलींचे प्रमाण हे वर्षनिहाय कमी होताना दिसत आहे त्यामुळे मानसिकता बदलण्याची गरज आहे. हुंडाबंदी, महिलांवरील अत्याचार यावर कारवाई होत असली तरी समाजात कुठेतरी मुलीबाबत नकारात्मकता दिसुन येत आहे.ज्यांना पाहिली मुलगी झाली आहे किंवा 2 मुली आहेत व नंतर माता गरोदर असेल तर अश्या कुटुंबावर आशा कार्यकर्ते व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत लक्ष ठेवले जात आहे तर कुठे गर्भलिंगनिदान होते का ? गर्भ लिंग तपासणी करून कुठे स्त्री भ्रूण हत्या होते का ? यासह मुलींवर व महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार प्रकार यावरही आरोग्य प्रशासन लक्ष ठेवून आहे.
कायद्याच्या धाकापेक्षा लोकांची मानसिकता सुधारणे व दृष्टीकोन बदलण्यावर भर दिला जात असून त्यासाठी आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास विभागासह अन्य विभाग एकत्रीत येऊन प्रयत्न करीत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी दिली.मुलगा मुलगी समान माना यावर अनेकजण जनजागृती करीत असले तरी प्रत्यक्षात स्तिथी मात्र सुधारलेली नाही.