घरकुल घोटाळा – चक्क कार्यालयातील कर्मचाऱ्यालाच मजूर दाखवून उचलले पैसे, बोगस बँक खाती
उस्मानाबाद पंचायत समितीच्या अनेक योजनात करोडोंचा घोळ,एसआयटी चौकशीची गरज
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद पंचायत समितीच्या गैरकारभाराचा आणखी एक प्रताप समोर आला आहे, घरकुल योजनेत एका शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मजूर दाखवीत पैसे उचलल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा कर्मचारी दुसरा कोणी नसून उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये काम करणारा आहे. मस्टर चेक करताना हा प्रकार समोर आला असून लेखी तक्रार देऊनही गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई न केल्याने यात गुन्हा नोंद करण्याची मागणी होत आहे.या कर्मचारी यांचे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या टोळीने बोगस बँक खाते उघडून परस्पर पैसे उचलले आहेत.
शोषखड्डे, शेवगा लागवड, मातोश्री पानंद शेतरस्ते योजनेच्या घोटाळ्यानंतर आता घरकुल योजनेतील घोटाळा समोर आल्याने उस्मानाबाद पंचायत समितीच्या सर्व योजनांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची गरज आहे.
उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये विजय रामचंद्र कोळी हे सहायक तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत असून 3 जून ते 8 जून या दरम्यान त्यांच्या नावाने, त्यांचे भाऊ व आईच्या यांना रामवाडी येथील एका घरकुलाच्या कामावर मजूर म्हणून दाखविण्यात आले. काम करण्यासाठी त्यांनी कोणतीही मागणी केलेली नसताना त्यांना मजूर म्हणून दाखविण्यात आले.
नरेगा वेबसाईटवर माहिती पडताळणी केली असता जॉबकार्ड कोळी यांना दिसले. कोळी यांनी मागणी केली नसताना व काम केलेले नसताना त्यांच्या नावे दुसऱ्याचे बँक खाते वापरून महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील बँक खात्यावर पैसे उचलण्यात आले. कोळी यांच महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खातेच नाही. याबाबत कोळी यांनी 26 सप्टेंबर रोजी पुराव्यासह तक्रार केली असून कोणतीही कारवाई केली नाही.