ग्रामसेवक व विमा कंपनीचा घोटाळा उघड – घरी बसुन बोगस पीक कापणी प्रयोग
शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या ग्रामसेवकाचे जिल्हाधिकारी यांनी केले निलंबन , इतर प्रकरणात कारवाई होणार
उस्मानाबाद – समय सारथी
ग्रामसेवक व विमा कंपनीचा घोटाळा उघड झाला असुन घरी बसुन बोगस पीक कापणी प्रयोग करणाऱ्या ग्रामसेवकाला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी निलंबित केले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या ग्रामसेवकाचे जिल्हाधिकारी यांनी निलंबन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी भूम तालुक्यातील पेठसांगवी प्रकरणात कारवाई केली असली तरी इतर प्रकरणात काय कार्यवाही करणार ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम तालुक्यातील पेठसांगवी येथे बोगस पीक कापणी प्रयोग बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे 11 ऑक्टोबर रोजी तक्रार केली होती. पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज व आढावा काढण्याचे करिता पाठसांगवी येथे सोयाबीन पिकाचा पीक कापणी प्रयोग न राबविता संबंधीत ग्रामसेवक व विमा कंपनीच्या प्रतिनिधीनी चुकीचा अहवाल सादर केला. याबाबत भुम येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यात ग्रामसेवक यु एस कावळे यांनी पीक कापणी प्रयोगाचे काम प्रत्यक्षात न करता केवळ आभासी पद्धतीने उत्पादनाची आकडेवारी नमूद करून अहवाल कृषी विभागास सादर केला. त्यामुळे कावळे यांचे निलंबन करून त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करावी असे आदेश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांना दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पेठसांगवी हे एक उदाहरण समोर आले असले तरी अनेक ठिकाणी असा प्रकार झाला आहे त्यामुळे तिथे कारवाई होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडुन पैसे घेतले होते, विशेष म्हणजे विमा कंपनी प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांकडुन हे पैसे फोन पे वर ऑनलाईन ट्रान्सफर केले होते. असे असतानाही अद्याप कंपनी व पैसे घेणाऱ्या संबंधीत व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला नाही.