उस्मानाबाद – समय सारथी
जिल्हा ग्रंथालय इमारतीचे काम अतिशय दर्जेदार करण्यात यावे. आतील सुविधाही उत्तम गुणवतेच्या असल्या पाहिजे. या इमारतीचे बांधकाम येत्या मे पर्यंत पूर्ण करावे,असे आदेश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे दिले. येथील जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. गडाख यांच्या हस्ते आज येथे झाले, तेव्हा ते बोलत होते.
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या इमारतीत अंधांसाठी ब्रेल लिपी विशेष विभाग तसेच ज्येष्ठ नागरिक विभाग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अभ्यासिका असे स्वतंत्र विभाग आणि डिजिटल ग्रंथालय या सुविधा देणारे सतरा विविध विभाग असणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील 439 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय त्यांचं परिरक्षण तपासणी कार्य या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाचनसंस्कृतीला तसंच सांस्कृतिक चळवळीला या जिल्हा ग्रंथालय इमारतीतून माहिती केंद्र या स्वरूपात जिल्हावासीयांना याचा उपयोग होणार आहे.
या इमारतीच्या कामाचे भूमीपूजन आणि कोनशिला अनावरण समारंभास आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, औरंगाबाद येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे, या ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.