गुन्हा नोंद – अपर जिल्हाधिकारी बनावट सही प्रकरण
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्हाधिकारी यांच्यानंतर प्रशासकीय प्रमुख असलेल्या अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले- डंबे यांच्या बनावट सहीचा आदेश काढल्याच्या प्रकरणात संबंधीत दोषी याच्यावर एम एल मैंदपवाड यांच्यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व अपर जिल्हाधिकारी आवले यांनी पुढाकार घेत आदेशनव्ये गुन्हा दाखल केला आहे. मैंदपवाड यांनी चक्क अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांच्या बनावट सह्या करून सिलिंग जमीन विक्रीचे आदेश काढले यात अनेक कागदपत्रे बोगस तयार केली. या प्रकरणात केवळ मैंदपवाड यांच्यावर गुन्हा नोंद केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या गंभीर व महत्वपूर्ण प्रकरणाचा पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण तावशीकर हे करीत आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 465,468,471 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मैंदपवाड यांनी एका प्रकरणात अपर जिल्हाधिकारी यांची बनावट सही केल्याचा लेखी कबुली जबाब सादर केला आहे. या कबुली जबाबनंतर व त्याच्या आधारे हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिलिंग जमीन विक्री परवानगी बोगस आदेश प्रकरणात मुळापर्यंत जाण्यासाठी संबंधित कर्मचारी याच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. बनावट आदेश, संचिका, टिपणी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेटर पड, सही,शिक्के, आवक- जावक क्रमांक हे जुळविण्यात आले असून यात काही प्रशासकीय व खासगी लोकांचा सहभाग असू शकतो. मैंदपवाड यांनी हे आदेश कोणाच्या फायद्यासाठी व सांगण्यावरून काढले हे तपासात स्पष्ट होईल अशी आशा आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील एका सिलिंग जमिनीची विक्री करण्यासाठी बोगस व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे केवळ अपर जिल्हाधिकारी यांचीच आदेशावर बनावट सही आहे असे नाही तर संचिकेत टिपण्णीमध्ये इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासुद्धा बनावट सह्या करण्यात आल्या.सिलिंग जमीन विक्रीची परवानगी संचिकाच बनावट रित्या करण्यात केवळ एकट्या मैंदपवाड यांचा हात आहे की त्यात इतर कोण कोण गुंतले आहेत हे पोलीस तपासानंतर बाहेर येणार आहे.
गुन्हा दाखल झाला असला तरी तपास सीआयडीकडे वर्ग करण्यासह अन्य मुद्यासाठी या प्रकरणात उच्च न्यायलयात याचिका दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी सांगितले.