गुन्हा दाखल, आरोपी फरार – तेरखेडा फटाका स्फ़ोट प्रकरण, अवैध पद्धतीने सुरु होती निर्मिती
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे एका फटाका कारखान्याला भीषण आग प्रकरणी संदेश चव्हाण याच्यावर येरमाळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्फ़ोटक पदार्थ निष्काळजीपणे वापरणे या कलम 286 प्रमाणे गुन्हा नोंद झाला असुन आरोपी फरार आहे. पीएसआय वाटोळे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान या ठिकाणी अवैधरित्या कोणत्याही परवानगी शिवाय फटाके साठवणे व निर्मिती करणे सुरु असल्याची बाब महसूल विभागाच्या चौकशीत उघड झाली आहे त्यामुळे आगामी काळात गुन्ह्याच्या कलमात वाढ होऊ शकते.
तेरखेडा येथे फटाका कारखान्याला लागलेल्या आगीत एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.भर वस्तीत फटाका कंपनीला आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. फायर ब्रिगेड, पोलीस व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तब्बल अग्निशामक दलाच्या जवळपास 15-20 गाड्यानी आग नियंत्रणात आली.
भरवस्तीत एका पत्र्याच्या शेडमध्ये फटाका निर्मिती व साठवून ठेवण्याचा हा उद्योग सुरु होता. येथे परवानगी कोणी व कोणत्या नियमात दिली यासह अनेक मुद्दे समोर आले होते. महसूल विभागाने केलेल्या चौकशीत या ठिकाणी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती त्यामुळे त्याअनुषंगाने कारवाई होणार आहे.
तेरखेडा या भागात अनेक ठिकाणी असे उद्योग सुरु असुन या भागातील कारखाने यांचा सर्व्हे करुन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे व पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या अवैध फटाका उद्योगाकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तेरखेडा येथे अनेक ठिकाणी वस्तीत व घरात फटाके निर्मिती केली जाते यामुळे अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.