गुन्हा दाखल – अरविंद नागरी बँकेत ठेवीदारांची फसवणूक, चेअरमन रोहीत दंडनाईक यांच्यासह संचालकांवर गुन्हा नोंद
आरोपी फरार, तपास सुरु – बँका बुडविण्याचा दंडनाईक पॅटर्न, ठेवीदारांनी तक्रार करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन
धाराशिव – समय सारथी
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची फसवणूक केल्या प्रकरणी शहरातील अरविंद नागरी बॅंकेचे तत्कालीन चेअरमन रोहितराज विजयकुमार दंडनाईक यांच्यासह अन्य संचालक यांच्या विरोधात फसवणूकसह अन्य कलमा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद होण्याची कुणकुण लागताच चेअरमन रोहितराज दंडनाईक यांच्यासह अन्य संचालक फरार झाले असुन पोलीस त्यांचा तपास करीत आहेत. अरविंद बँकेने ठेवीदार यांची फसवणूक केल्याचे प्रकरण दैनिक समय सारथीने समोर आणले होते त्यानंतर ठेवीदार यांनी समोर येत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर करीत आहेत.
एका ठेवीदाराची 10 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कलम 420, 406, 409, 120 ब व महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हीतसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 मधील कलम 3 व 4 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बँकेत हजारो ठेवीदारांची फसवणूक झाली असून फसवणूक झालेल्या इतर ठेवीदार यांनी आनंद नगर पोलीस व आर्थिक गुन्हे शाखा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दैनिक समय सारथीशी बोलताना केले आहे.
बँका बुडविण्याचा दंडनाईक पॅटर्न यनिमित्ताने समोर आला असुन गेल्या महिन्यात वसंतदादा बँकेने करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद असुन चेअरमन विजयकुमार दंडनाईक यांच्यासह संचालक मंडळ फरार आहे. 18 जणांची जामीन धाराशिव कोर्टाने फेटाळली आहे त्यातील काही जण संभाजी नगर उच्च न्यायालयात गेले आहेत.
अरविंद नागरी पतसंस्थेने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार ढोकी येथील पांडुरंग गोविंद वाकुरे यांनी केली आहे. वाकुरे यांना 14 टक्के व्याजाचे आमिष दाखविले होते त्यामुळे त्यांनी 2012 साली अरविंद बँकेत 8 लाख 75 हजार एक वर्षासाठी गुंतविले होते मात्र 2013 साली मुदत संपुन 10 वर्ष झाले तरी वाकुरे यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत.
तब्बल 10 वर्ष चकरा मारून देखील दंडनाईक यांनी पैसे दिले नाहीत अखेर कंटाळून वाकुरे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे इतर ठेवीदार यांना घेऊन तक्रार दिली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याची तात्काळ दखल घेत गुन्हा नोंद केल्याने वाकुरे यांच्यासह अन्य ठेवीदार यांना तब्बल 10 वर्षानंतर न्याय मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ यांनी ठेवीदार यांना विश्वास दिला.