गुंडाराज, पवनचक्की माफिया – परंडा मतदार संघात टोळ्यांची दहशत, गृहमंत्र्यांना भेटणार, राजीनाम्याची मागणी
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्यावर गंभीर आरोप – महाविकास आघाडीची पत्रकार परिषद तर खासदार ओमराजे अलिप्त
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम,परंडा वाशी या मतदारसंघात मारहाण, धमकावणे असे प्रकार वाढले असुन गुंडाराज सुरु झाले आहे. पवनचक्की चालकांना मारहाण करुन खंडणी उकळने, बाजार समिती संचालक यांना बंदुकीचा धाक दाखवून अपहरण व मारहाण यासारख्या घटना घडत असुन स्थानिकासह मुंबई पुणे येथील टोळ्यांची दहशत वाढली आहे. या सर्व प्रकाराला पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पाठबळ असुन पोलिसांत गुन्हा नोंद करताना त्यांचा दबाव असतो अशी टीका केली.
पालकमंत्री डॉ सावंत यांच्या राजीनामाची मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी करीत या सर्व गुंडाराज बाबतीत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितले. उद्या फडणवीस यांची धाराशिव येथे वेळ मागितली असुन ते देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. या सर्व घटनावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे लक्ष असुन अधिवेशनात याचे पडसाद दिसून येतील असे मोटे म्हणाले तसेच कारवाई व प्रतिबंध न झाल्यास लवकरच महाविकास आघाडीची ठोस भुमिका घेऊ असे सांगितले.
महाविकास आघाडीच्या भुम परंडा येथील नेत्यांनी शिंगोली विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी माजी आमदार राहुल मोटे, शिवसेनेचे रणजित पाटील, मेघराज पाटील, परंडा बाजार समितीचे संचालक जैन, ऍड देवकते, बुद्धिवान लटके यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व आम्ही राजकीय विरोधक असतानाही गेल्या 25 वर्षात गुंडागर्दी केली नाही किंवा तसे झाले नाही मात्र आताची स्तिथी चिंताजनक असल्याचे मोटे व रणजित पाटील यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या पुर्वनियोजित पत्रकार परिषदेला धाराशिव जिल्हा पातळीवरील नेते मात्र उपस्थितीत नव्हते. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हे या पत्रकार परिषदेला येणार असल्याचे आयोजकांनी सुरुवातीला सांगितले मात्र खासदार धाराशिव तालुक्यातील अंत्यविधीला गेल्याचे सांगण्यात आले. ते निघालेत, वाटेत आहेत,आलेच थोड्या वेळेत, पोहचतील असे म्हणत म्हणत पत्रकार परिषद संपली त्यामुळे नेत्यांना खासदार यांनी एकटे पडल्याची चर्चा मात्र चांगलीच रंगली. खासदार ओमराजे यांनी या वादापासून अलिप्त राहणे पसंद केल्याचे बोलले जात आहे, ओमराजे हे पत्रकार परिषद संपल्यावर संबंधिताना भेटायला आले असल्याचे आयोजकांनी कळविले तर आमदार कैलास पाटील हे पुर्वनियोजित दौऱ्यानुसार मुंबई येथे होते.
पहिल्यांदा दहशतीचा वापर केला जात आहे. पुणे मुंबई व स्थानिक गुंड हे पवनचक्की चालक, कर्मचारी यांना मारहाण करुन खंडणी मागत आहेत. स्थानिकांना कामे द्या नाहीतर मारहाण करोडो रुपयांची खंडणी अश्या 8- 9 घटना घडल्या आहेत. पवनचक्की कंपनी यांचे काही चुकत असेल तर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे ग्रीड कनेकटीव्हिटी, मेढा परवानगी व इतर महसूली परवानगी पूर्तता आहे का ? हे पण जिल्हाधिकारी यांनी पाहावे व कारवाई करावी अशी मागणी मोटे यांनी केली. आगामी काळात पवनचक्की माध्यमातून 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
अनधिकृत पवनचक्की चौकशी जिल्हाधिकारी व गुंड याचा बंदोबस्त पोलीस अधीक्षक यांनी करावा. मोक्का लावलेले आरोपी, गँग वॉर इथे वाढत असुन त्याची दहशत आहे.पवनचक्की चालक हे शेतकरी यांची जमीन कवडीमोल भावाने घेऊन लुट करीत आहेत, शेतकरी जामीन मालक पेक्षा दलाल व एजन्ट जास्त पैसे कमवत आहेत. या भागात पुणे येथील 3-4 टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. मारहाण करा कामे घ्या किंवा खंडणी घ्या असा आरोप मोटे यांनी केला.
पालकमंत्री सावंत हे जाहीर भाषणात यांनी आयएएस, आयपीएस अधिकारी दम देतात की, तुम्ही औकातीत रहा, नाहीतर शिवसैनिक बघून घेतील. तत्कालीन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांची बदली पालकमंत्री यांच्यामुळे झाली.अधिकारी यांनी दबाव घेऊ नये. पालकमंत्री यांच्यात दबावाने अनेक महसूल प्रकरणाचे निर्णय मेरिट असताना दिले जात नाहीत. त्यांनी दबाव टाकला तर तुम्ही अधिकारी का घेता असे सांगत मोटे यांनी अनेक आरोप केले.