गुंडाराज पर्व , पिस्तुलबाजी – परंडा बाजार समिती निवडणुक राडा प्रकरण
गुन्हा दाखल, आरोपी फरार – राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वातावरण पेटले
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीच्यापूर्वी महाविकास आघाडीच्या संचालकांचे अपहरण करुन जबर मारहाण केल्याप्रकरणी मंत्री डॉ सावंत गटाचे कार्यकर्ते सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे यांच्यासह 30-35 जनावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारहाण, अपहरण, पिस्तूलीचा धाक अश्या या थरारक घटनांनी परंडा भागात एकच दहशत माजली आहे. या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले असुन गुंडाराज पर्वाची ही सुरुवात तर नाही ना ? अशी प्रतिक्रिया नागरिकांत उमटत आहे.
पळवून नेलेल्या संचालकांना मिरज येथे सोडल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील टेम्भूर्णी पोलिसात तक्रार देत गुन्हा नोंद केला. माजी आमदार राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील यांनी तब्बल 3 तास पोलिस ठाण्यात ठाण मांडले. संचालकांना पळवून नेल्याचे कळताच खुद्द राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यात लक्ष घातल्यावर काही तासात अज्ञात स्थळी मिरज येथे संचालक यांना सोडून देण्यात आल्याचे कळते.
सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे, गणेश जगदाळे, प्रदीप पाडुळे, प्रशांत शिंदे, समाधान मिस्कीन, किरण उर्फ लादेन बरकडे, जगदीश ठवरे पाटील यांच्यासह इतर 30 ते 35 जणांनी मारहाण, अपहरण व बंदूकबाजी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जयकुमार जैन यांनी दिली त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृहाची मोठी तोडफोड केली आहे.
जैन यांच्यासह सुजित देवकते, रवींद्र जगताप, संजय पवार, दादा घोगरे, सोमनाथ शीरसाठ, शंकर जाधव, हरी नलवडे या 7 संचालकासह हरिश्चंद्र मिस्कीन, किरण शिंदे, सुदाम देशमुख व शरद झोंबाडे अशी मंडळी उजनी येथील विश्रामगृहात मुक्कामी होती त्यावेळी शासकीय विश्रामगृहाच्या खिडकीच्या काचा फोडून व दरवाजा फोडून कांबळे व त्यांचे साथीदार तिथे आले व नुकसान केले.
गाडीत बसा, तुम्हाला मस्ती आलीय. सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत आम्हाला मतदान करा म्हणून मारहाण करू लागले. आमची सत्ता आहे, आमचे कोणी वाकडे करू शकत नाही असे म्हणत कांबळे व साथीदार यांनी लोखंडी कुकरी, लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने सर्वांना बसवून टेम्भूर्णी बायपास रोडने पंढरपूर येथे नेले. मिरज येथील अज्ञात स्थळी सोडताना कांबळे यांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली जीवे सोडणार नाही, तुमच्या बरोबर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना देखील जिवंत सोडणार नाही असे म्हणत पिस्तूलीने धाक दाखविला असा जबाब दिला.
टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुरन 337/2023 भादवि कलम 327,326, 324, 363,365,323,143,147,149,452,504,506, सह आर्म ॲक्ट कलम 3,25 व सार्वजनिक संपत्ती आणि प्रतिबंध अधिनियम 1984 चे 3 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत आहेत.
परंडा येथे पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, तणावपुर्ण शांतता
परंडा येथे दिवसभर तणावाचे वातावरण होते, महायुती व महाविकास आघाडी गट एकमेकांसोबत भिडल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला त्यानंतर स्तिथी निवळली. कोणीही अर्ज दाखल न केल्याने निवड प्रक्रिया पुढे ढकलली आहे.
परंडा बाजार समितीत 18 जागापैकी 13 जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या असून, 5 जागा भाजप शिवसेना शिंदे गट यांच्या ताब्यात आहेत. परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
माफियागिरी वाढली, गावगुंडाना पोसुन खतपाणी नको
सुरेश कांबळे यांनी यापूर्वी भुम-परंडा विधानसभा निवडणुक लढविली असुन त्यांच्या अध्यक्षतेखाली जय हनुमान ग्रुप व मल्हार आर्मी अश्या संघटना आहेत. सत्तेच्या बाजूने कांबळे यांचा नेहमीच कल असतो. आज गुन्हा दाखल झालेल्या आरोपीत काही जणांवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती आहे.
धाराशिव पोलिसांनी येथील माफियाला आळा घालण्यासाठी वेळीच पावले उचलायला हवीत तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी सुद्धा कोणत्याही गावगुंडाना पोसुन खतपाणी घालू नये. धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या तुलनेत भुम परंडा येथे वाळूमाफिया, पवनचक्की व इतर धंदे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या आशिर्वादामुळे वाढले आहेत त्यातून गटबाजी, माफियागिरीला पोषक वातावरण तयार होत आहे. या भागात काही हल्ल्याचे गोळीबारचे प्रकारही घडले आहेत. बाउन्सर कल्चर इथे सर्रास पाहायला मिळत आहे त्यामुळे नेत्यांची हवाच हवा होतेय.
संबंध नाही – राजीनाम्याची मागणी तर जिल्हा बंदचा इशारा
सुरेश कांबळे हे मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे समर्थक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत यापूर्वी असे प्रकार मतदार संघात झाले नाहीत. पालकमंत्री सावंत यांच्या सूचनेनुसार कांबळे यांनी बिहार प्रमाणे फिल्मी स्टाईलने हा प्रकार केल्याचा आरोप माजी आमदार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे तसेच मंत्री सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान सावंत यांनी या घटनेशी आपला कोणताही संबंध नसुन विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आम्ही कोणलाही पळविले नाही, सांगितले नाही किंवा आम्ही अर्जही दाखल केला नाही अशी भुमिका सावंत यांनी सांगितली. सर्व आरोपी फरार आहेत, कांबळेसह सर्व आरोपीना अटक न केल्यास धाराशिव जिल्हा बंदचा इशारा माजी आमदार पाटील व मोटे यांनी दिला आहे.